नवी दिल्ली - कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. लाखोंच्या संख्येत लोक आपापल्या घरापासून शहरांमध्ये अडकल्या आहेत. त्यामुळे प्रवासी मजुरांच्या मदतीसाठी बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटी पुढे आले आहेत. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आतापर्यंत अनेक प्रवासी मजूर, विद्यार्थी व महिलांना त्यांच्या घरी पोहचवले आहे. आता, मजूर व गरिबांना घरी पोहोचविण्यासाठी आम आदमी पक्षाच्या एका खासदाराने स्वत:ला वर्षाकाठी मिळमारी ३४ तिकीटं देऊ केली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खासदार संजय सिंह यांच्या निर्णयाचं कौतुक केलंय.
लॉकडाऊन काळात मुंबई, दिल्ली, बंगळुरुसारख्या मोठ्या शहरात अडकलेल्या मजूर वर्गाला घरी पोहोचविण्याचं काम अनेकांनी केलंय. त्यात, अभिनेता सोनू सूदचं नाव आघाडीवरुन असून आत्तापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त मजूरांना सोनूने घरी पोहोचवले आहे. तसेच, अभिनेत्री स्वरा भास्करही या मोहिमेत सामील झाली आहे. आतापर्यंत स्वराने दिल्लीत अडकलेल्या 1350 प्रवासी मजूरांना बिहार व उत्तर प्रदेशमधील त्यांच्या घरी पोहचवले आहे. आता, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी त्यांना खासदारकीच्या कोट्यातून मिळणारे ३४ विमान प्रवासाची तिकीटं मजूरांना दिली आहेत. संजय सिंह यांनी बुधवारी ३३ मजूरांसह दिल्लीतून पटना असा विमान प्रवास केला. दिल्लीतील नॉर्थ अवेन्यू निवासस्थानातून ते दुपारी १ वाजता विमातळाकडे रवाना झाले होते. यापूर्वीही दिल्लीत अडकलेल्या युपी आणि बिहारमधील मजूरांना बसमधून घरी पाठविण्याचं काम संजय सिंह यांनी केलंय.
खासदारांना देशांतर्गत प्रवास करण्यासाठी वर्षाला ३४ बिझनेस क्लासचे तिकीट देण्यात येतात. संजय सिंह यांनी एकाचवेळी हे आरक्षित तिकीट वापरत मंजूरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी महत्वांच पाऊल उचललं. संजय सिंह यांचा हा निर्णय इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संजय सिंह यांचं कौतुक केलं आहे. संजय सिंह यांनीही केजरीवाल यांच्या ट्विटला रिप्लाय देत, धन्यवाद अरविंद भाई असे म्हटलंय. जे आदर्श घेऊन राजकारणात आपल्यासोबत चालत आहोत, तेच आदर्श आयुष्यभर पालन करु, असेही सिंह यांनी म्हटलंय.