AAP Vs Asaduddin Owaisi: २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीतील सर्व विधानसभा मतदारसंघात सुंदरकांड पठणाचे आयोजन केले आहे. यावरून एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आम आदमी पक्षावर टीका केली. याला आम आदमी पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी ओवेसी यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली.
आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचा छोटा रिचार्ज असल्याची टीका ओवेसी यांनी केली होती. यावर राघव चड्ढा यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. कोणत्याही नेत्यावर भाष्य करू इच्छित नाही, ज्यांनी असे विधान केले आहे, त्यांचे अभिनंदन. अरविंद केजरीवाल हे प्रभू श्रीरामांचे परम भक्त आहेत. प्रत्येक काम प्रभू श्रीराम आणि हनुमानाचे नाव घेऊन अरविंद केजरीवाल सुरू करतात, असे राघव चड्ढा यांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले होते ओवेसी?
आरएसएसच्या छोटा रिचार्जने ठरवले आहे की, दिल्लीतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सुंदरकांड पठणाचे आयोजन केले जाईल. २२ जानेवारीला असलेल्या उद्घाटन सोहळ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्हाला आठवण करून देतो की या लोकांनी बिल्किस बानोच्या मुद्द्यावर मौन पाळले होते. त्यांना फक्त शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर बोलायचे आहे. सुंदरकांड हे शिक्षण आहे की आरोग्य? खरी गोष्ट म्हणजे न्याय देण्यास टाळाटाळ करत आहेत. संघाच्या अजेंड्याला पूर्ण पाठिंबा देत आहे. आम्ही बाबरीबद्दल अवाक्षर काढायचे नाही आणि तुम्ही न्याय, प्रेम, अमूक-तमूक असे करत हिंदुत्व बळकट करत राहायचे, वाह, अशी एक पोस्ट ओवेसी यांनी एक्सवर केली.