AAP MP Sanjay Singh:दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना अटक करीत ईडीने सत्ताधारी आम आदमी पार्टीला आणखी एक मोठा हादरा दिला. मनीष सिसोदिया यांच्या पाठोपाठ मद्य धोरण घोटाळ्यातील दुसरी सर्वात मोठी अटक ठरली आहे. ईडीने संजय सिंह यांना न्यायालयासमोर हजर केले. यानंतर न्यायालयाने संजय सिंह यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. यानंतर पुन्हा एकदा संजय सिंह यांनी भाजपवर आगपाखड केली.
संजय सिंह यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. संजय सिंह यांचा मोबाईल ताब्यात घेतलेला असताना आता त्यांची कोठडी कशासाठी हवीय, असा सवाल न्यायालयाने ईडीला विचारला होता. यावर ईडीने पैशांच्या देवाणघेवाणीचा हवाला देत ही रक्कम दोन कोटींची आहे. तसेच संजय सिंह यांचा कर्मचारी सर्वेश मिश्र याने या व्यवहाराची कबुली दिली आहे. सरकारी साक्षीदार बनलेल्या दिनेश अरोडा यानेच संजय सिंह यांना फोन करून पैसे मिळाले का, हे कन्फर्म केले होते. याचबरोब ईडीने आणखी तीन लोक आहेत, ज्यांची संजय सिंह यांच्यासोबत चौकशी करायची आहे, असे ईडीने न्यायालयास सांगितले. यानंतर न्यायालयाने निर्णय दिला. यानंतर मीडियाशी बोलताना संजय सिंह यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
अदानींच्या नोकरांना घाबरत नाही, सर्व आरोप चुकीचे
नरेंद्र मोदी हे अदानींचे नोकर असून आम्ही अदानींच्या नोकराला घाबरत नाही. जेवढे अत्याचार करायचे आहेत, तेवढे करा. आम्ही तयार आहोत. काही हरकत नाही, असे सांगत, माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे आहेत, असा दावा संजय सिंह यांनी केला. अटकेनंतरही संजय सिंह यांनी एक व्हिडिओ जारी करत भाजपवर हल्लाबोल केला होता.
दरम्यान, अचानक ईडी माझ्या घरी पोहोचली. दिवसभर छापेमारी केली. पण काहीही निष्पन्न झाले नाही. आता बळजबरीने अटक केली जात आहे. आम्ही आम आदमी पार्टीचे सैनिक आहोत. नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की, निवडणुकीत तुमचा वाईटरित्या पराभव होणार आहे. हे तुमच्या निराशेचे आणि पराभवाचे लक्षण आहे. जेव्हा जेव्हा अत्याचार वाढतात, तेव्हा त्याविरोधात जनतेकडून आवाज उठवला जातो. आम्ही प्रसंगी मरण पत्करू पण घाबरणार नाही. याआधीही आवाज उठवला, यापुढेही आवाज उठवणार, या शब्दांत संजय सिंह यांनी भाजपला सुनावले होते.