AAP MP Sanjay Singh : नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यामुळं मंगळवारी (दि.१७) दिल्लीची कमान आता आतिशी यांच्या हाती आली आहे. त्यामुळं दिल्लीच्या जनतेला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर अरविंद केजरीवाल सर्व सरकारी सुविधा सोडणार आहेत. आतिशी मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज आपचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आठवड्याभरात त्यांचा सरकारी बंगला रिकामा करतील. त्यानंतर अरविंद केजरीवाल जनतेच्या दरबारात जाणार आहेत. जनतेत राहून आम्ही जनतेकडून ईमानदार असल्याचे प्रमाणपत्र मागू. मला वाटते की, दिल्लीतील जनता अरविंद केजरीवाल यांना ईमानदार सिद्ध करेल, असे संजय सिंह म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री असताना ज्या सुविधा मिळत होत्या त्याही ते सोडणार आहेत. मात्र, यानंतर त्यांची सुरक्षा धोक्यात येईल. असे अनेक धोकादायक प्रकार त्यांच्याबाबतीत घडले आहेत. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणाले की, देव स्वतः माझे रक्षण करेल, असे संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना कोणता बंगला मिळणार, हे अद्याप ठरलेले नाही. तुमच्या आशीर्वादाने अरविंद केजरीवाल यांना नक्कीच कुठेतरी नवीन ठिकाण मिळेल, असे संजय सिंह म्हणाले. तसेच, खासदार संजय सिंह यांनीही पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजप अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काय करत आहे, हे तुम्ही सर्व पाहत आहात. त्यांच्या ईमानदारीवर हल्ला झाल्याचे ते म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी प्रामाणिकपणे दिल्लीची सेवा केली, पण त्यांना खोट्या खटल्यात तुरुंगात पाठवण्यात आले. शिक्षणमंत्री असलेले मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद जैन यांना तुरुंगात टाकण्याचे काम केले. याशिवाय, संपूर्ण पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहात. तरीही अरविंद केजरीवाल यांनी धाडसाने उत्तर देण्याचे काम केले, असे संजय सिंह म्हणाले.