आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. तिहार जेलमध्ये त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचं सांगितलं. भयानक गुन्हेगारांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र हा अधिकार अरविंद केजरीवाल यांच्याकडून मोदी सरकार काढून घेत आहे असंही संजय सिंह यांनी सांगितलं.
"आपल्या वकिलांशी झालेल्या भेटीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यामार्फत संदेश दिला की निवडून आलेल्या आमदारांनी त्यांच्या भागात जाऊन काम करावं. या संदेशाची चौकशी सुरू करण्यात आली असून वकील आणि कुटुंबियांशी तुमच्या भेटीगाठी थांबवल्या जातील, अशी त्यांना धमकी दिली जात आहे."
"अरविंद केजरीवाल जेलमध्ये बसून कोणतीही माहिती घेऊ शकत नाहीत का?, त्यांच्या कुटुंबाची माहिती घेऊ शकत नाहीत का?, वकिलांना भेटू शकत नाहीत? लीगल मीटिंगमध्येही 8-10 पोलीस उभे असतात. मीटिंग दरम्यान कोणीही वकिलांचं ऐकू शकत नाही, अशी कायदेशीर तरतूद आहे. दिल्लीच्या तिहार जेलला तुम्हाला हिटलरच्या गॅस चेंबर आणि टॉर्चर चेंबरमध्ये बदलायचं आहे का?"
"एक मुख्यमंत्री आपल्या आमदारांना संदेश देऊ शकत नाही का? अरविंद केजरीवाल यांना फोडण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात ते यशस्वी होणार नसून दिल्लीतील जनता तुमच्याकडून उत्तर घेईल. जेलचं उत्तर मतदानाने द्यायला हवं" असं देखील संजय सिंह यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीने अटक केली होती.