'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 03:38 PM2024-06-18T15:38:35+5:302024-06-18T15:39:44+5:30

Swati Maliwal Letter to Sharad Pawar Rahul Gandhi: मालीवाल यांनी इंडिया आघाडीच्या सर्व बड्या नेत्यांना पत्र लिहिली आहेत.

AAP MP Swati Maliwal Letter to Sharad Pawar Rahul Gandhi Uddhav Thackeray of India Block over Vibhav Kumar Case | 'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!

'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!

Swati Maliwal Letter to Sharad Pawar Rahul Gandhi, Vibhav Kumar AAP: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय विभव कुमार यांच्यावर आरोप करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मालीवाल यांनी इंडिया ब्लॉकच्या सर्व बड्या नेत्यांना पत्र लिहिली आहेत. स्वाती मालीवाल यांनी राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया ब्लॉकच्या सर्व बड्या नेत्यांना पत्र लिहून त्यांच्याकडे न्याय मागितला आहे.

स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून दिली माहिती

मी आठ वर्षे दिल्ली महिला आयोगा (DCW) चे अध्यक्षपद भूषवले आहे. या कालावधीत मी महिला आणि मुलांविरोधातील १.७ लाखांहून अधिक तक्रारी ऐकल्या आहेत. पण दुर्दैवाने खासदार झाल्यानंतर १३ मे रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पीएने मला मारहाण केली. या घटनेनंतर मी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्धार केला. पण अशा परिस्थितीत मला साथ देण्याऐवजी माझ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते माझ्याच चारित्र्यावर नकारात्मक बोलू लागले आहेत. कोणाचाही दबाव न जुमानता, कोणाच्याही पुढे न झुकता मी महिला आयोगाला खूप उच्च स्थानावर पोहोचवले आहे. पण खेदाची गोष्ट म्हणजे मला आधी मुख्यमंत्र्यांच्या घरी बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर माझ्या चारित्र्याबाबत वाईट बोलण्यात आले, असे ट्विट स्वाती मालीवाल यांनी केले.

मालीवाल म्हणाले की, माझी प्रतिष्ठा, चारित्र्य आणि विश्वासार्हता डागाळण्यासाठी सोशल मीडियावर अपप्रचार सुरू करण्यात आला. माझ्याविरुद्ध पसरवलेल्या खोट्या गोष्टींमुळे मला बलात्कार आणि खुनाच्या धमक्या येत आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी मला तुमची भेट घेण्यासाठी वेळ देण्यात यावा, असे मालीवाल यांनी लिहिले. तसेच, मी तुमच्या उत्तराची वाट पाहीन, असेही त्यांनी लिहिले.

विभव कुमारवर काय आरोप?

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. केजरीवाल यांचे निकटवर्तीय विभव कुमार यांच्यावर त्यांनी हे आरोप केले आहेत. पक्षाचे नेते संजय सिंह यांनी नंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वाती मालीवाल यांच्याशी झालेल्या घटनेची दखल घेतली असून ते याप्रकरणी कठोर कारवाई करतील, असे सांगितले आहे. पण अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे स्वाती मालीवाल यांचे म्हणणे आहे.

Web Title: AAP MP Swati Maliwal Letter to Sharad Pawar Rahul Gandhi Uddhav Thackeray of India Block over Vibhav Kumar Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.