Priyanka Kakkar, BJP vs AAP, CAA : भारत सरकारने दोनच दिवसांपूर्वीच देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) लागू केला. भाजपा सरकारकडून या कायद्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे तर विरोधक यावर टीका करत आहेत. असे असताना, आम आदमी पार्टी (AAP) आक्रमकपणे कायद्याला विरोध करताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दावा केला होता की, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून लोक आल्याने देशात चोरी आणि बलात्काराच्या घटना वाढतील। त्यातच आता त्यांच्याच पक्षातील आणखी एका महिला नेत्याने यावर भाष्य केले आहे. भारतातील गरीब लोक संपले आहेत का, भाजप बाहेरील गरीबांना देशात आणून स्थायिक करण्याचा हट्ट का धरत आहे?, असा सवाल आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी केला. तसेच, या कायद्याच्या अंमलबजावणीचा दूरगामी परिणाम म्हणजे या देशात दंगलीही होऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या.
एएनआयशी बोलताना प्रियंका कक्कर यांनी देशात सौहार्द बिघडण्याची आणि दंगली होण्याची भीती व्यक्त केली. केजरीवाल यांच्या मुद्द्यांचाही त्यांनी पुनरुच्चार केला. त्यात त्यांनी चोरी आणि महिलांवरील अत्याचार वाढण्याची भीती व्यक्त केली. प्रियंका कक्कर म्हणाल्या, "पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील लोकांना आपल्या देशात आणून स्थायिक केले जाईल. त्यांची व्यवस्था कुठे केली जाणार? तुम्हीच विचार करा, तुमच्या घरासमोरच्या झोपडपट्टीत एक पाकिस्तानी असेल तर तुमची मुलगी आणि तुम्हाला सुरक्षित वाटेल का? कायदा आणि सुव्यवस्थेची हमी भाजपा घेणार आहे का? अशा गोष्टींनी भविष्यात भारतात दंगली होतील, सौहार्द बिघडेल, चोरी, लुटमार वाढेल. भाजपला हेच सारं करायचं आहे का?"
भारतातले गरीब संपले का, देशाबाहेरचे गरीब का आणताय?
"भारतातले दैनंदिन प्रश्न संपले का, देशातील महागाई संपली का, बेरोजगारी संपली का? भारतातले गरिब संपले का, मग इतर देशातील गरिबांना इथे आणून स्थायिक करायचा हट्ट का बाळगत आहात?" असा सवाल कक्कर यांनी केला. "आपल्या देशातील 11 लाख श्रीमंत लोक देश सोडून गेले जे रोजगार देत होते. मोदीजींनी त्यांना परत आणले पाहिजे आणि संपूर्ण देशातील गरीब लोकांचा बंदोबस्त करून आमच्या संसाधनात हिस्सा देऊ नये. बेकायदेशीर घुसखोरी कायदेशीर करा, असे म्हणणारे भाजपचेच सरकार आहे. प्रत्येकाला नागरिकत्व दिल्यामुळे कॅनडातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली. कॅनडाने सर्वप्रथम प्रत्येकाला नागरिकत्व दिले. आज तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पहा. जे देश अवैध स्थलांतर रोखत आहेत, त्यांच्याकडून धडा घेतला पाहिजे. त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण होईल. तो तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात यावा," असे कक्कर यांनी सांगितले.