नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं असून दिल्लीत 53 टक्के मतदान झालंय. मतदानानंतर काही वेळातच माध्यमांचे एक्सिट पोल हाती आला आहे. दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट संकेत एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलमधून मिळाले आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी आम आदमी पक्षाला 49-63 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दिल्लीत विधानसभा निवडणुकांसाठी अंदाजे 53 टक्के मतदान झाले आहे. त्यापैकी, केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला सर्वाधिक मतदान मिळालंय. दिल्लीत आपला 49 ते 63 जागा मिळतील, असा सर्वेक्षण अंदाज आहे. भाजपाला दिल्लीत 5 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या वेळी भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसला यंदा 4 जागा मिळणार असल्याचं सूतोवाच करण्यात आलं आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलमधून जागांसह कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान? मिळणार हेही सांगण्यात आलंय. त्यानुसार, झालेल्या मतदानाच्या टक्केवारीपैकी 50.04 टक्के मतदान केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मिळणार आहे. तर, भाजपाला 36 टक्के मते मिळतील, असा सर्वेक्षण अंदाज आहे. या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला 09 टक्के तर इतर पक्षांना 02.06 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.
आम आदमी पार्टी : 50.04%भाजप : 36%काँग्रेस : 09%इतर : 02.06%
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले होते. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागतो हे 11 फेब्रुवारीला मतमोजणीनंतरच समजणार आहे.