नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सपशेल पिछेहाट झाली आहे. मात्र पंजाबमध्ये काँग्रेसची कामगिरी काही प्रमाणात समाधानकारक झाली आहे. असं असताना पंजाब काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील शाब्दिक चकमक अद्याप थांबलेली नाही. त्यातच आता सिद्धू यांना आम आदमी पक्षातून ऑफर आली आहे.
पंजाब विधासभेतील विरोधीपक्षनेते हरपाल सिंग चीमा यांनी काँग्रेस नेते अमरिंदर सिंग यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना आम आदमी पक्षात येण्याची ऑफर दिली. सिद्धू यांचा आम आदमी पक्षात पुरेसा मानसन्मान केला जाईल, अशी ग्वाही देखील हरपाल सिंग यांनी दिली. तसेच इमानदार लोकांसाठी आपचे दरवाजे कायम खुले असल्याचे सिद्धू यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांतर सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. एकीकडे सिद्धू संधी मिळेल तेव्हा अमरिंदर सिंग यांच्यावर टीका करत आहेत. तर अमरिंदर सिंग यांनी लोकसभेत काँग्रेसच्या खराब कामगिरीसाठी सिद्धू यांना जबाबदार धरले आहे. पाकिस्तानी सेना प्रमुखांची गळेभेट घेतल्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेसला नुकसान झाल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटले होते. तसेच सिद्धू यांचे मंत्रीपद देखील बदलण्यात आले आहे. त्यामुळे आपकडून मिळालेल्या ऑफरवर सिद्धू काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.