AAP की Congress, 2024 मध्ये BJP च्या विरोधात कोण असेल? जेपी नड्डा म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 13:32 IST2022-12-09T13:31:16+5:302022-12-09T13:32:39+5:30
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकानंतर आता सर्वांचे लक्ष आगामी लोकसभा निवडणुकांवर लागले आहे.

AAP की Congress, 2024 मध्ये BJP च्या विरोधात कोण असेल? जेपी नड्डा म्हणतात...
नवी दिल्ली: नुकताच विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. गुजरातमध्ये भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर काँग्रेसला हिमाचल प्रदेशमध्ये यश मिळाले. याशिवाय, आम आदमी पार्टीला दिल्ली एमसीडीमध्ये विजय मिळाला. यानंतर आता सर्वांचे लक्ष 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर लागले आहे. लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कोणता उभा राहणार? यावर चर्चा सुरू आहे.
गुजरात निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या तयारीत असलेल्या आम आदमी पक्षाच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, कोणाशीही लढण्यास तयार असल्याचे भाजपनेही स्पष्ट केले आहे. यासोबतच तुमचे सिक्योरिटी डिपॉझिट जप्त करण्यात येईल, असा इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 'आप'बद्दल प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, 'जो कोणी लढायला येईल, भारतीय जनता पक्ष कोणाशीही लढण्यास तयार आहे.'
यावेळी त्यांनी सर्वात वेगवान राष्ट्रीय पक्ष होण्याच्या 'आप'च्या दाव्याचीही खिल्ली उडवली. त्यांनी इतिहास सांगितला, 'काल मी ऐकले, ते म्हणतात की, आम्ही 10 वर्षांत सर्वात वेगाने वाढणारा पक्ष आहोत. त्यांना काहीच कळत नाही. ते फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. भारतीय जनसंघ दोन वर्षांत राष्ट्रीय पक्ष बनला होता. NPP हा 2014 साली राष्ट्रीय पक्ष बनला. 3 वर्षात राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष झाला. हे कोण आहेत 10 वर्षात राष्ट्रीय पक्ष होणारे,' अशी टीका त्यांनी यावेळी केली.