गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगूलवाजला असून तारखाही जाहीर झाल्या आहेत. येथे 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, भारतीय जनता पक्ष एकूण 119 जागा जिंकेल, असा अंदाज एका ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला केवळ 3 जागांवरच समाधान मानावे लागेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हा ओपिनियन पोल इंडिया टीव्हीने प्रसिद्ध केला आहे. यातच आज आम आदमी पार्टीने येथे आपल्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचीही घोषणा केली आहे.
कुणाला किती मते मिळणार? -इंडिया टीव्हीच्या या सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये काँग्रेसला 59 जागांवर विजय मिळू शकतो. तर आम आदमी पार्टीला केवळ 3 जागा मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणात भाजपला सर्वाधिक मते मिळतील, असा अंदाज आहे. एकूण मतांपैकी 52% मते भाजपला, तर 35% मते काँग्रेसला जातील. गुजरात निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागलेल्या आम आदमी पक्षाला या सर्वेक्षणानुसार केवळ 9% मतांवरच समाधान मानावे लागणार आहे.
आज सी व्होटरनेही आपला ओपिनियन पोल जारी केला आहे. सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, भाजपला 131-139 जागा मिळू शकतात. असे झाल्यास भाजपचे ते सर्वश्रेष्ठ प्रदर्शन असेल. भाजपने यापूर्वी 2002 मझ्ये 127 जागा जिंकल्या होत्या. सर्वेक्षणानुसार, 2017 मध्ये 77 जागा जिंकणारी काँग्रेस 31-39 जागा जिंकू शकते. तसेच पहिल्यांदाच सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढवत असलेल्या 'आप'ला 7-15 सीट मिळू शकतात. तसेच इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.