AAP Rally At Ramlila Maidan: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीच्या रामलीला मैदानावर आले आहेत. आम आदमी पक्षाने रविवारी (11 जून) मोठी रॅली काढली. रॅलीला संबोधित करताना केजरीवालांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. '12 वर्षांपूर्वी आम्ही भ्रष्टाचाराविरोधात या मैदानावर एकत्र आलो होतो. आज 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा याच मैदानावर आपण एका अहंकारी हुकूमशहाला हटवण्यासाठी एकत्र आलो आहोत,' अशी टीका त्यांनी केली.
'आमच्याकडे 100 मनीष सिसोदिया आहेत'केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात आम आदमी पार्टीने दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठी रॅली काढली. यावेळी केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारच्या हुकूमशाही अध्यादेशाविरोधात दिल्लीतील जनता रामलीला मैदानावर एकजूट होत आहे. मोदीना वाटतं की, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकल्याने आमचे काम थांबेल. आमच्याकडे एक नाही तर 100 सिसोदिया आहेत, 100 सत्येंद्र आहेत. एक गेला तर दुसरा कामावर येईल. त्यांना तुरुंगात टाकून काम झाले नाही, म्हणून त्यांनी अध्यादेश आणला. दिल्लीतील जनतेवर अध्यादेश लादला जात आहे. दिल्लीचे सातही खासदार घरात लपून बसले आहेत', अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
'देश चालवायचं मोदींना समजत'केजरीवाल पुढे म्हणाले की, 'चौथी पास राजाला देश कसा चालवायचा, हे समजत नाही. सगळीकडे बेरोजगारी पसरली आहे, ही कशी दूर करायची, ते समजत नाही. भ्रष्टाचार कसा दूर करायचा, हे समजत नाही. जीएसटीमुळे व्यापारी चिंतेत आहेत. रेल्वेचे काय झाले आहे. 2002 मध्ये पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 12 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. गेली 9 वर्षे ते पंतप्रधान आहेत. 2015 मध्ये मी मुख्यमंत्री झालो, मला 8 वर्षे झाली. मी आज त्यांना आव्हान देतो, इतक्या वर्षात तुम्ही काय काम केले आणि मी काय काम केले...'
'140 कोटी लोक अध्यादेशाला विरोध करतील''या अध्यादेशाविरोधात मी सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहे. दिल्लीची जनता, संपूर्ण देशाची जनता आमच्यासोबत आहे. 140 कोटी मिळून या अध्यादेशाला विरोध करतील आणि लोकशाही वाचवतील. हे फक्त दिल्लीकरांच्या बाबतीत घडले आहे, असे समजू नका. असाच अध्यादेश राजस्थानसाठी, पंजाबसाठी, मध्यप्रदेशसाठी, महाराष्ट्रासाठी आणला जाईल, हे आता थांबायला हवे. आता दिल्लीत लोकशाही राहणार नाही, हुकूमशाही चालेल,' अशी टीकाही त्यांनी यावेली केली.
'मोदींचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही'अरविंद केजरीवाल म्हणाले की, '19 मे रोजी देशाच्या पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला. सर्वोच्च न्यायालयावर माझा विश्वास नाही, असे पंतप्रधान म्हणाले. 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा पंतप्रधान आला आहे, जो सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवत नाही. अशा अहंकारी पंतप्रधानांवर देशातील जनता विश्वास ठेवू शकत नाही. आज या व्यासपीठावरुन एका अहंकारी हुकूमशहाला देशातून हटवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आज या व्यासपीठावरुन पुन्हा आंदोलन सुरू होणार,' असंही केजरीवाल यावेली म्हणाले.