नवी दिल्ली : आपच्या बंडखोर आमदार अलका लांबा यांनी मंगळवारला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळे त्या लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार असल्यास कयास लावला जात आहे.
चांदनी चौक मतदारसंघातील आमदार असलेल्या अलका लांबा यांनी २०१५ मध्ये आपची उमेदवारी घेऊन विजय संपादन केला होता. गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आप नेत्यांशी मतभेद झाल्याने त्या पक्षापासून दूर आहेत. त्यांनी उघडपणे आपच्या नेत्यांवर टीका केली असून आपसोबत कोणतेही नाते राहिले नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर लांबा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्यामुळे त्यांचा काँग्रेस प्रवेश म्हणजे केवळ औपचारिकता राहिल्याचे बोलले जात आहे. सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर बोलताना लांबा म्हणाल्या, सोनिया गांधी केवळ काँग्रेसच्या नेत्या नाही तर त्या यूपीएच्या चेअरपर्सन आहेत. धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणाºया पक्षाच्या त्या नेत्या आहेत. त्यांची भेट घेण्याची अनेक दिवसांपासून इच्छा होती. आज संधी मिळाली. सद्यस्थितीत काँग्रेससारखा पक्ष देशाला नवी दिशा देऊ शकतो. या अनुषंगाने त्यांच्याशी अनेक मुद्यांवर चर्चा झाली. राजकारणामध्ये चर्चा होत असतात. अलका लांबा यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरू झाली आहे. त्या एनएसयूआयच्या अध्यक्षा होत्या. तसेच दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा होत्या.
दिल्ली प्रदेशाध्यक्षाची निवड लवकरच?दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. गेल्या दीड महिन्यापासून हे पद रिक्त आहे. काही दिवसांपूर्वी अरविंदर सिंग लवली व डॉ. ए. के. वालिया यांनी सुद्धा सोनिया गांधी यांची भेट घेतली. लवकरच प्रदेध्यक्षाची घोषणा केली जाईल, असे या दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.