आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांचं वजन साडे आठ किलोने कमी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. केंद्र सरकारवर षडयंत्र रचत असल्याचा आरोपही आप नेत्याने केला आहे.
अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये त्रास देणं हा भाजपाचा उद्देश असून अरविंद केजरीवाल यांच्या जीवाशी खेळणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं संजय शर्मा म्हणाले. "केजरीवाल यांना गंभीर आजार व्हावा किंवा जेलमध्ये त्यांच्यासोबत काहीतही वाईट घडावं, यासाठी भाजपा आणि त्यांचे केंद्र सरकार मोठा कट रचत आहे."
"अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती" असा दावा त्यांनी केला. त्यावेळी त्यांचे वजन ७० किलो होते, आज अरविंद केजरीवाल यांचे वजन साडेआठ किलोने कमी होऊन ६१.५ किलो झालं आहे असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे.
वजन कसं कमी झालं याचा तपास करणं शक्य नाही. याशिवाय जवळपास पाच वेळा असं घडलं आहे की, केजरीवाल यांची शुगर लेव्हल ५० च्या खाली गेली आहे, झोपताना शुगर लेव्हल कमी झाल्यास कोणीही कोमात जाऊ शकतं असंही आप नेते संजय यांनी सांगितलं आहे.