आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी तिहार तुरुंगातून सुटल्यानंतर बुधवारी (३ एप्रिल) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. सुनीता यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निवासस्थान गाठले. सुनीता केजरीवाल यांनी संजय सिंह यांचे स्वागत केले.
संजय सिंह यानंतर आप मुख्यालयात पोहोचले, जिथे त्यांनी देशातील जनतेला अशा हुकूमशहांपासून सावध राहण्यास सांगितले जे त्यांच्या डोळ्यात पाणी आणतील. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले आणि दिल्लीतील दोन कोटी जनता या अश्रूंचं उत्तर भाजपाला देईल. केजरीवाल लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतील आणि त्यांना चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतील.
संजय सिंह यांनी पक्ष मुख्यालयात आप कार्यकर्त्यांना सांगितलं की, 'देशाच्या हुकूमशहाला माझा आवाज ऐकू येत असेल तर त्यांनी तो ऐकावा, आम्ही आंदोलनातून जन्माला आलेली आम आदमी पार्टी आहोत. तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन हे तुरुंगात आहेत कारण या सर्वांना दिल्लीतील दोन कोटी लोकांना सुविधा द्यायच्या आहेत.
आप नेत्याने भाजपावर हल्लाबोल केला आणि आरोप केला की राजधानीत मोफत पाणी, वीज आणि मोहल्ला क्लिनिक बंद करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा हवा आहे. देशात मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत, आम्ही सर्व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहोत. भाजपाला उत्तर देण्याची वेळ आली आहे. केजरीवाल राजीनामा देणार नाहीत आणि दिल्लीतील दोन कोटी लोकांसाठी काम करत राहतील.