नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत राजधानी दिल्लीवर तिसऱ्यांदा विजयाचा झेंडा फडकवला. दिल्लीत आपलं बस्तान बसवणाऱ्या आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पातळीवर स्थिर करण्यासाठी योजना करण्यात येत आहे. त्या दृष्टीने हालचालींना वेग आला असून त्याचा पहिला टप्पा बिहार निवडणूक असण्याची शक्यता आहे.
'आप'च्या विजयानंतर दिल्लीतील कार्यालयात एक पोस्टर झळकले. यावर राष्ट्र उभारणीसाठी आम आदमी पक्षात सामील व्हा, असं आवाहन करण्यात आले आहे. दिल्लीत विजयाची हॅटट्रीक साधल्यानंतर पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी केजरीवाल प्रयत्नशील आहे. त्यासाठी नवीन सदस्य जोडणीला पहिल्या दिवशीपासूनच प्राधान्य देण्यात 'आप'ने सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणूक निर्णायक ठरू शकते. याआधी केजरीवाल यांनी 'आप'ला देशातील इतर राज्यात रुजवण्याचा प्रयत्न केला होता. पंजाबमध्ये त्यांना चांगले यश आले होते. मात्र पक्षांतर्गत मतभेदामुळे पंजाबमधूनही आपची पिछेहाट झाली. आता आपने कात टाकली आहे. तर विरोधकांचा चेहरा म्हणून पुढं येण्याची क्षमता केजरीवाल यांच्यामध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या स्वरात सुरू झाली आहे.
काँग्रेसची जागा घेण्याची संधी
दिल्लीत काँग्रेसला सत्तेतून बाहेर करत आम आदमी पक्षाने आपले बस्तान बसवले आहे. काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या साम्राज्याला केजरीवाल यांनी सुरंग लावला. सलग दुसऱ्यांना काँग्रेसला दिल्लीत खातंही उघडता आलं नाही. अर्थात काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवत केजरीवाल यांनी दिल्लीतील स्पेस भरून काढला. आता काँग्रेसशासित राज्यातही केजरीवाल हाच पॅटर्न राबविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यासाठी सदस्य जोडणीवर भर देण्यात येत आहे.