गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. मात्र, असे असले तरी अरविंद केजरीवाल आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष बनणार असल्याने खुश दिसत आहेत. यासाठी त्यांनी गुजरातच्या जनतेचे आभारही मानले आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी तीन अटी आहेत. या अटींची पूर्तता केल्यानंतर त्या पक्षाला अनेक सुविधा दिल्या जातात. यात दिल्लीत केंद्रीय कार्यालयासाठी मोफत सरकारी जमीन अथवा सरकारी बंगला यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या अटींनुसार, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला किमान 4 राज्यांमध्ये 6 टक्के मते मिळणे आवश्यक आहे. दुसरी अट म्हणजे त्या पक्षाने लोकसभेच्या दोन टक्के म्हणजे 11 जागा जिंकल्या तरी हा दर्जा मिळू शकतो. तिसरी अट म्हणजे पक्षाला किमान चार राज्यात राज्य पक्षाचा दर्जा मिळायला हवा. विधानसभेत किमान दोन जागा जिंकल्यावर हा दर्जा मिळतो.
दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. तर गोव्यात आणि गुजरातमध्ये त्यांचे आमदार आहेत. या पक्षाने निवडणूक आयोगाच्या तीनपैकी दोन अटी पूर्ण केल्या आहेत. या चार राज्यांत त्यांना सहा टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. मात्र, अद्याप त्यांना गुजरातमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळणे बाकी आहे. गुजरातमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळताच आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाचे म्हणजे, सध्या देशभरात एकूण आठ राष्ट्रीय पक्ष आहेत. यांत भाजप, काँग्रेस, बीएसपी, टीएमसी, एनसीपी, सीपीआई, सीपीएम आणि एनपीपीचा समावेश आहे.
राष्ट्रीय पक्ष होण्याचे फायदे -1. जेव्हा एखादा पक्ष राष्ट्रीय पक्ष होतो, तेव्हा त्याला दिल्लीमध्ये केंद्रीय कार्यालय बनविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून एखादा बंगला अथवा जमीन मोफत दिली जाते. यानंतर भाजप आणि काँग्रेसप्रमाणेच आम आदमी पक्षाचेही दिल्लीत केंद्रीय कार्यालय असेल. सध्या दिल्लीतील कार्यालयासाठी 'आप'ने स्वतःच्याच सरकारकडून जमीन भाड्याने घेतली आहे.
2.आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह 'झाडू', हे त्यांच्याकरता नेहमीसाठी राखीव होईल.
3. निवडणूक प्रचारासाठी पक्ष आपले 40 स्टार प्रचारक मैदानात उतरवू शकतो, ज्यांचा खर्च उमेदवारांच्या खर्चाव्यतिरिक्त असेल.
4. दूरदर्शनवर प्रचारासाठी आम आदमी पक्षाला एक निरश्चित कालावधी मिळेल.