नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका सुरू झाला आहे. आम आदमी पक्षाही (आप) आजपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करत आहे. आपचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरत आहे. आज पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार प्रचार शुभारंभप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
आज आप दिल्लीत प्रचाराची सुरुवात करणार आहे, तर दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी सिंह आजपासून तीन दिवस आसाममध्ये प्रचार करणार आहेत. आतिशी या दिब्रुगड आणि सोनितपूर लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांसाठी मते मागणार आहेत. निवडणूक रॅलींसोबतच त्या आसाममधील दुलियाजानमध्ये रोड शोही करणार आहे. या जागांसाठी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
याचबरोबर, दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात सशर्त जामिनावर सुटलेले संजय सिंह आज पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. संजय सिंह सकाळी १० वाजता पक्षाच्या दिल्ली मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतर संजय सिंह यांची ही तिसरी पत्रकार परिषद आहे. संजय सिंह एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत, असे पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर असे सांगण्यात आले आहे. जेलमधून सुटल्यानंतर ते सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत.
संजय सिंह हे ६ महिने तिहारमध्ये बंद होते. सुप्रीम कोर्टातून त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते सातत्याने पंतप्रधान नरेंद मोदींवर निशाणा साधत आहेत. जेलमधून आल्यानंतर संजय सिंह म्हणाले होते की, ईडी आणि सीबीआयने मिळून ४५६ साक्षीदार बनवले, मात्र यापैकी फक्त ४ ठिकाणी केजरीवाल यांचे नाव आहे. या संपूर्ण प्रकरणात मगुंटा रेड्डी, राघव मगुंटा, शरद रेड्डी आणि सीएम अरविंद केजरीवाल यांची नावे घेण्यात आली. ज्यामध्ये मगुंटा रेड्डी यांनी चौकशीदरम्यान केजरीवाल यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाला तुरुंगात टाकण्यात आले, असे संजय सिंह यांनी सांगितले होते.