नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी आज राज्यसभेत सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. लवकरच तुम्हा लोकांचे वाईट दिवस येणार आहेत, अशा शब्दांत जया बच्चन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ विधेयक 2021 वर सभागृहात चर्चा सुरू असताना जया बच्चन या राज्यसभेत आक्रमक झालेल्या दिसून आल्या. त्यांनी सरकारला वाईट दिवस येण्याचा शापही दिला.
दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) अंमलबजावणी संचालनालयात हजर झाल्यानंतर जया बच्चन यांची ही टिप्पणी आली आहे. यावेळी, माझ्यावर वैयक्तिकरित्या टीका करण्यात आली, पण मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, असे जया बच्चन यांनी राज्यसभेत सांगितले. तसेच, मी तुम्हा लोकांना शाप देते की तुमचे वाईट दिवस लवकरच येणार आहेत, असे म्हणत भाजपा नेत्यांवर हल्लाबोल केला. यानंतर सभागृहातील गदारोळ झाला आणि सभापतींनी सभागृहाचे कामकाज पाच वाजेपर्यंत तहकूब केले.
सभागृहाचा अपमान केल्याचा आरोपभाजपा खासदार राकेश सिन्हा यांनी जया बच्चन यांच्यावर संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा आरोप केला आहे. तसेच, जया बच्चन यांनी राज्यसभेच्या सभापतींना वैयक्तिकरित्या संबोधित केल्याचा आरोपही राकेश सिन्हा यांनी केला. कोणत्याही खासदाराने सभागृहात असे वागू नये, असे वागणे म्हणजे सभापतींचा अपमान आहे, असे राकेश सिन्हा म्हणाले.
पनामा पेपर्स प्रकरणी ऐश्वर्या राय बच्चनची चौकशी 2016 च्या पनामा पेपर्स लीक प्रकरणी ऐश्वर्या राय बच्चन सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाली होती. सोमवारी सकाळी सुरु झालेली ही चौकशी संध्याकाळी 7 च्या सुमारास संपली. यावेळी माध्यमांशी ऐश्वर्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने माध्यमांशी बोलणे टाळले. ऐश्वर्या राय बच्चन हिची अंमलबजावणी संचालनालयाकडून फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत चौकशी केली जात आहे. याआधीही ऐश्वर्या रायने दोन वेळा ईडीसमोर हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली होती.
पनमा पेपर्स लीक प्रकरणात कुणाची नावे?या प्रकरणात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अदानी यांच्या ज्येष्ठ बंधूंचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात बच्चन कुटुंबियांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सध्या अंमलबजावणी संचालनालयाकडून केली जात आहे.
पनामा पेपर्स लीक प्रकरण नेमकं काय?पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये देशातील नेते, चित्रपट अभिनेते, खेळाडू, उद्योगपती, प्रत्येक वर्गातील नामवंत व्यक्तींची नावे आहेत. या सर्व लोकांवर करचुकवेगिरीचा आरोप आहे. ज्याच्या मदतीने एजन्सी आता आपले काम करत आहे.