नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचार आज संपला. सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व जागांवर (नवी दिल्ली, पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली, उत्तर-पूर्व दिल्ली, उत्तर-पश्चिम दिल्ली आणि चांदणी चौक) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे.
पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतिशी यांनी गुरुवारी भाजपा उमेदवार गौतम गंभीर यांच्यावर निशाणा साधला आहे. अतिशी यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी गौतम गंभीर यांनी काढलेले एक पत्रकच वाचून दाखवले. त्यामधील आक्षेपार्ह टिप्पणी वाचताना आतिशी या भावूक झाल्या आणि त्यांना रडू कोसळले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत प्रचारादरम्यान आतिशी यांनी गौतम गंभीर यांना शिकाऊ असल्याचे संबोधले होते. गौतम गंभीर यांची प्रसिद्धी त्यांच्याविरोधातच जाईल. कारण, मोठ्या व्यक्तींना लोक फक्त पाहतात. मात्र, त्यांच्यासाठी जो वेळ देईल, त्यालाच प्रतिनिधी म्हणून निवडतात, असेही आतिशी म्हणाल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान पार पडले असून आणखी दोन टप्पे बाकी आहेत. हे दोन टप्पे 12 आणि 19 तारखेला होणार आहेत. त्यामुळे सर्व दिग्गज नेत्यांचे लक्ष या दोन टप्प्यांकडे लागून राहिले आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.