ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - ड्युटीवरील पोलिसाला शिवीगाळ रून त्याला धमकी दिल्याबद्दल आम आदमी पक्षाच्या आमदार सरिता सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
दिल्लीतील रोहताश नगर परिसरात रविवारी रात्री एका नेत्याच्या विवाहसमारंभावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ओमपाल हे बंदोबस्तावर तैनात होते. त्यावेळी सरिता सिंह यांचा ड्रायव्हर गाडी मागे घेत असताना गाडीची ओमपाल यांच्या मोटरसायकलला धडक बसली. त्यावरून ओमपाल व सिंग यांचा ड्रायव्हर यांच्यात वादावादी झाली असता प्रथम सिंह यांचा ड्रायव्हर व त्यानंतर स्वत: सरिता सिंह यांनी ओमपाल यांना धमकी दिली.
तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचे शूटिंग करून व्हिडीओ तयार केला आणि काही तासांतच तो व्हायरल झाला. त्या व्हिडीओत सरिता सिंह ओमपाल यांना धमकावताना दिसत आहेत. याप्रकरणी ओमपाल यांच्या तक्रारीनंतर भजनपुरा पोलिस स्थानकात सरिता सिंह व त्यांच्या ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सरिता सिंह यांनी मात्र आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगत प्रथम त्या पोलिस अधिका-यानेच आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांना कायम लक्ष्य करणा-याम आदमी पक्षाचे आम्ही सदस्य असल्यामुळेच पोलिस आम्हाला लक्ष्य करत आहेत. त्या व्हिडीओतील काही भाग मीडियाने प्रसिद्ध केला, मात्र त्या पोलिसाने आमच्याशी गैरवर्तणूक केलेला भाग मुद्दाम दाखवण्यात आला नाही, असे सरिता सिंह यांनी म्हटले.