लखनऊ : उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Uttar Pradesh Assembly Election 2022) राजकीय पक्षांच्या बैठका सुरु झाल्या आहे. यातच आता आम आदमी पार्टीचे नेते आणि खासदार संजय सिंह ( Sanjay Singh)यांनी बुधवारी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बैठक झाली. या भेटीबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मात्र, समाजवादी पार्टीने दोन्ही नेत्यांमधील ही भेट एक शिष्टाचार असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी आदमी पार्टीचे प्रभारी संजय सिंह बुधवारी लखनऊमधील 'जनेश्वर ट्रस्ट'च्या कार्यालयात पोहोचले आणि तेथे त्यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. अखिलेश यांची भेट घेतल्यानंतर संजय सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय सिंह म्हणाले, "भ्रष्टाचारमुक्त उत्तर प्रदेश आणि हुकूमशाही राजवट नष्ट करायची आहे. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. आज मुक्त उत्तर प्रदेश निर्माण करण्यासाठी राजकीय चर्चा करण्यात आल्या."
याचबरोबर, आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या युतीच्या प्रश्नावर संजय सिंह म्हणाले की, आम्ही एकमेकांशी बोलत आहोत आणि युतीच्या दिशेने जात आहोत. युतीबाबत चांगली अर्थपूर्ण चर्चा झाली असून, काही निर्णय होताच आपल्याला कळवण्यात येईल, असे संजय सिंह म्हणाले. तसेच, जागांबाबत चर्चा झाली आहे का? असा सवाल केल्यानंतर संजय सिंह म्हणाले की, आता समान अजेंड्यावर चर्चा झाली असून उत्तर प्रदेशला भाजपाच्या कुशासनातून मुक्त करायचे आहे. त्याबाबत चर्चा झाली आहे.
याआधीही झाली होती भेट!अलीकडच्या काळात संजय सिंह आणि अखिलेश यादव यांची ही तिसऱ्यांदा भेट झाली. याआधी सोमवारी मुलायम सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी मुलायम सिंह यांना पुष्पगुच्छ देताना त्यांचे छायाचित्र ट्विट केले आणि लिहिले, "उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, भारतीय राजकारणाचे नेते मुलायम सिंह यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी त्यांची लखनऊ येथील निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या."
याशिवाय, संजय सिंह यांनी जुलैमध्ये अखिलेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त देखील भेट घेतली होती, तेव्हा त्यांनी अखिलेश यादव यांचे कौतुक केले होते आणि त्यांच्या आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील साम्य देखील मांडले होते. त्यामुळे या भेटीची आणि त्यांच्या वक्तव्याची उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसेच, काही राजकीय विश्लेषक समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टी यांच्यात युती होण्याची शक्यता नाकारत नाहीत.