गुजरातमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल आता स्पष्ट झालं असून भाजपने रेकॉर्डब्रेक विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विजयाबद्दल गुजरातच्या जनतेचं आभारही मानलं. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहासह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळेच, या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे यंदा प्रथमच महाराष्ट्रातील गुजराती मतदारांनाही मतदानादिवशी पगारी सुट्टी देण्यात आली होती. तर, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे दिग्गज देवेंद्र फडणवीस हेही गुजरातच्या मैदानात प्रचारासाठी उतरले होते. फडणवीसांनी ११ उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचार केला, त्यासाठी, सभा आणि पत्रकार परिषदाही घेतल्या. त्यापैकी, १० उमेदवार विजयी झाले आहेत. म्हणजेच फडणवीसांचा स्ट्राईकरेट हा ९१ टक्के राहिला आहे.
गुजरात निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मैदानात उतरुन प्रचार केला. पंकजा मुंडेंनी २ मतदारसंघात प्रचार केला असून या दोन्ही भाजप उमेदवारांचा विजय झाला आहे. तर, देवेंद्र फडणवीसांनी ११ मतदारसंघातील उमेदवारांसाठी खिंड लढवली. मात्र, येथील एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, ११ पैकी १० उमेदवार तेथे जिंकून आले आहेत. येथील गारियाधार मतदारसंघातील भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. फडणवीसांनी, प्रांतीज, तळाजा, गारियाधार, महुआ, बायड, लिंबायत, मणिनगर, वैजलपूर, ठक्करबाप्पा नगर, गांधीनगर उत्तर, गांधीनगर दक्षिण या ११ मतदारसंघातील उमेदवारांसाठी प्रचार केला. त्यापैकी एका उमेदवाराचा पराभव झाला असून १० उमदेवारांनी विजयी मिळवला आहे.
४८१९ मतांनी भाजप उमेदवार पराभूत
गारियधार येथील केशुभाई नाकराणी यांचा आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने पराभव केला आहे. गुजरातच्या सौराष्ट्रमधील गरियाधर विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे सुधीरभाई वघानी यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला आहे. सुधीरभाई यांना ६०९४४ मत मिळाले असून ६०४६३ ईवीएम मशिनवरील मतदान असून पोस्टल मतांची संख्या ४८१ एवढी आहे. या जागेवर आम आदमी पार्टीला भाजपच्या केशुभाई नाकराणी यांचं आव्हान होतं. मात्र, केशुभाई यांना ५६१२५ मत मिळाली आहेत. त्यामुळे, येथील जागेवर भाजप उमेदवाराचा ४८१९ एवढ्या मतांनी पराभव झाला आहे. दरम्यान, येथील जागेवर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर असून काँग्रेसच्या दिव्येशभाई छावडा यांना केवळ १५०९९ मतं घेता आली आहेत.