नवी दिल्ली : मुंबईतील मेट्रोच्या कारशेडसाठी शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाणाऱ्या आरे जंगलातील 2500 हजार झाडे तोडली. यावरून महाराष्ट्र सरकारवर टीका होत असताना दिल्लीमेट्रोने एक निर्णय घेत तब्बल 13 हजार झाडे वाचविण्यात आली होती. दिल्ली मेट्रोलाही अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. या संकटांवर मात करून 337 किमी लांबीचा मेट्रो मार्ग उभारण्यात आला आहे.
फेज-3 वेळी दिल्ली मेट्रोने केवळ झाडेच वाचविली नाहीत तर फेज 1 च्या डेपोसाठी स्मारके आणि भरावाची जागाही तोडण्यापासून वाचविली होती. फेज 1 ते फेज 3 साठी तब्बल 56307 झाडे तोडण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, मेट्रोने 12580 झाडे वाचविली होती. अन्य 43727 वृक्ष तोडण्यात आले होते आणि ते अनिवार्य होते.
मेट्रोच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रकल्पासाठी पर्यावरणाचा विचार करणेही गरजेचे आहे. जेव्हा योजनेच्या डीपीआरवर काम करतो तेव्हा प्रत्यक्षात जमिनीवर काही तडजोड करावी लागते. जर एखादी छोटी तडजोड करून एखादे झाड वाचत असेल तर ती करावी. दिल्ली मेट्रोचा मार्ग बदलून ही झाडे वाचविण्यात आली.
दिल्ली मेट्रोसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडे तोडावी लागणार असल्याने झाडांचे स्थलांतर करण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा प्रयोग आताही करत आहेत. एका वृक्षाला 5 किमीच्या परिघामध्ये स्थलांतरित करता येते, असेही अनुज दयाल यांनी सांगितले. तसेच एका वृक्षाच्या बदल्यात 10 वृक्षांची लागवड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लीमध्ये आतापर्यंत वन विभागाने 5,35,150 रोपटी लावली आहेत.