नवी दिल्ली - आज देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशवासिय आज अनेक संकटांसोबत लढत आहेत. कोरोना, पूर, भूस्खलन आदी संकटांमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही मदत करत आहोत. तसेच राज्यांवरील आपत्तीवर केंद्र सरकार मिळून मदत करत आहे. कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
"आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहे" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच 130 कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने कोरोनावर विजय मिळवू. देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे असंही मोदींनी सांगितलं.
जगाला भारताकडून उत्सुकता आणि अपेक्षा आहेत. आम्ही आत्मनिर्भर बनलो तर जगाला काहीतरी देऊ शकतो. जगाला कच्चा माल देऊन आम्ही किती दिवस पक्का माल खरेदी करणार आहोत? एके काळी परदेशातून गहू आयात केले जात होते. आज शेतकऱ्यांनी गहू भारतातच उत्पादित केला. गरजा पूर्ण झाल्या आणि इतर देशांना तो पाठविला जातो. कृषी क्षेत्राला कायद्यातून मुक्त केला, असे मोदी म्हणाले.
अंतराळ क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होतो, तेव्हा शेजाऱ्यांनाही त्याचा फायदा होतो. ऊर्जा क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यास भारत जगाचे हेल्थ डेस्टिनेशन बनेल. कोरोना संकटात 'आत्मनिर्भर भारत' हा 130 कोटी भारतीयांसाठी मंत्र बनला आहे. 'आत्मनिर्भर भारत' हे स्वप्न प्रत्यक्षात येणारच. देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास असल्याचे मोदी म्हणाले.