देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला. इन्कम टॅक्स आणि इतर सामान्यांशी संबंधित असलेल्या कररचनेत काहीही बदल करण्यात आले नाही. परंतु क्रिप्टोकरन्सी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी डिजिटल रूपी नावाची डिजिटल करन्सी लवकरच चलनात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विदेशी क्रिप्टोकरन्सीला पर्याय म्हणून डिजिटल रूपी चलनात आणण्यात येणार असल्याने हे आत्मनिर्भर भारतच्या दिशेने टाकलेलं आणखी पाऊल असल्याचा सूर दिसून येत आहे. या अर्थसंकल्पाबाबत कोण काय म्हणालं, पाहूया...
'भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन यांचे खूप खूप आभार!', असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर, 'आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या दोन्ही योजना देशात रोजगार निर्मिती करत आहेत', अशा मोजक्या शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
--
आत्मनिर्भर भारताचा आत्मनिर्भर अर्थसंकल्प. देशातील सर्व घटकांना दिलासा देऊन, सर्वसमावेशक व भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प! 'सबका साथ, सबका विकास'चा नारा अधिक बुलंद! आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनःपूर्वक आभार!, असं ट्वीट भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केलं. तर राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही अर्थसंकल्पाबाबत सकारात्मक मत व्यक्त केलं आहे. 'भारताची स्वावलंबनाकडे वेगाने वाटचाल! शेतीपासून शिक्षणापर्यंत, रेल्वेपासून महामार्गापर्यंत, नोकरीपासून व्यवसायापर्यंत, प्रत्येकला घर, प्रत्येक घरात पाणी, आरोग्यापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत... प्रत्येक वर्गाच्या विकासासाठी असलेला अर्थसंकल्प', असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
--