नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आत्मनिर्भरतेबाबत देशाच्या युवा आणि उद्योगपतींसमोर आपले विचार मांडले. आत्मनिर्भर होऊन केवळ आपल्याला जागतिक बाजारपेठ भारतीय उत्पादनांनी भरायची नाहीय, तर भारतीय उत्पादनांनी जगभरातील लोकांच्या हृदयात स्थान प्राप्त करायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी आज आपल्या लिंक्डइन अकाऊंटवर एक लेख प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी आत्मनिर्भर भारतामागचा उद्देश देशातील नागरिकांना समजावून सांगितला आहे. भारतीय कंपन्या जे उत्पादन तयार करतील त्याचं संपूर्ण जगभरात कौतुक व्हायला हवं, असं मोदी म्हणाले.
भारत देश कौशल्य आणि कलागुणांचं केंद्रस्थान राहीला आहे. देशातील स्टार्टअप उद्योगांना मिळालेलं यश हे देशातील तरुणांमधील उत्साहाची जाणीव करुन देतात. देशातील युवा नवनवीन सेवा आणि उत्पादनांची निर्मिती करत आहेत. त्यांच्यासाठी देश आणि विदेशात मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत, असं मोदी म्हणतात.
"संपूर्ण जग आज स्वस्त, टीकाऊ आणि प्रयोगशील उत्पादनांच्या शोधात आहे. आत्मनिर्भर भारत कौशल्य आणि गुणवत्ता या दोन सिद्धांतावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा आमचा ध्यास आहे. पण त्याचसोबत आमच्या उत्पादनांची गुणवत्ता देखील उत्तम असायला हवी", असं मोदींनी म्हटलं आहे.
जेव्हा आपण 'मेक इन इंडिया'चा नारा देतो तेव्हा फक्त भारतात उत्पादन व्हावं हा एकमेव उद्देश त्यामागे नाही. तर भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना जागतिक पातळीवर देखील मान्यता मिळायला हवी, असा उद्देश आहे. भारत आज संपूर्ण जगासाठी मोठी बाजारपेठ असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.