नवी दिल्ली - "आत्मनिर्भर" या लोकप्रिय शब्दाला ऑक्सफर्डचा बहुमान मिळाला आहे. ऑक्सफर्डच्या भाषा विभागाने आत्मनिर्भर या शब्दाला 2020 या वर्षातील हिंदी भाषेच्या विशेष शब्दाचा मान दिला आहे. भाषातज्ज्ञांच्या समितीने या शब्दाची निवड केली आहे. भाषातज्ज्ञ कृतिका अग्रवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सेल यांचा या समितीत समावेश होता. गेल्या वर्षभरात लोकांच्या भावना, एकंदरीत स्थितीची माहिती देणाऱ्या, सांस्कृतिक महत्त्व सांगणाऱ्या शब्दाची ऑक्सफर्डकडून हिंदी शब्द म्हणून निवड केली जाते.
ऑक्सफर्ड भाषाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी पॅकेजची घोषणा केली. अर्थव्यवस्था, समाज आणि वैयक्तिक पातळीवर आत्मनिर्भर होण्याच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला होता. त्यानंतरच देशभरात सार्वजनिक पातळीवर आत्मनिर्भर भारत या शब्दाचा वापर वाढल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. कोरोनाच्या लसीची देशात झालेली निर्मिती हे आत्मनिर्भर भारत या मोहिमेचे सर्वात मोठं यश आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये राजपथावर बायोटेक्नॉलॉजी विभागाचा आत्मनिर्भर भारत मोहिमेचं महत्त्व सांगणारा आणि लसीकरणाची माहिती देणारा रथही होता. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिवरामकृष्णन व्यंकटेश्वरन यांनी आत्मनिर्भर भारत या शब्दाला विविध पातळीवर वेगळी ओळख मिळाल्याच म्हटलं आहे. याआधी 2017 मध्ये आधार, 2018 मध्ये नारीशक्ती, 2019 मध्ये संविधान या शब्दाची निवड करण्यात आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.