खम्माम (तेलंगणा) : या देशात आता शेतकऱ्यांचे सरकार येईल आणि लोकसभा निवडणुकीनंतर बीआरएसच्या पुढाकाराने सत्ता स्थापन झाल्यास देशातील शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल, अशी घोषणा भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसच्या भव्य सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली. याच सभेत अनेक विरोधक भाजप सरकारविरोधात एकवटले. हे सरकार बदलण्यासाठी एकत्र आलो असल्याचे विरोधकांनी यावेळी स्पष्ट केले.
‘मेक इन इंडिया’ उपक्रम हा ‘जोक इन इंडिया’ बनला आहे, अशा शब्दांत के. चंद्रशेखर राव यांनी बुधवारी भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. खम्मामच्या इतिहासात बीआरएसची ही सभा सर्वांत मोठी ठरली आहे. देशात मोठ्या बदलाचे ते संकेत मानले जात आहेत.
के. चंद्रशेखर राव म्हणाले की, भारत साधनसंपत्तीने भरलेला असताना अमेरिका आणि इतरांकडून कर्ज आणि मदत मागत आहे. अमेरिकेत केवळ २९ टक्के शेतीयोग्य जमीन आहे. चीनमध्ये १६ टक्के आणि भारतात ८३ कोटी एकरपैकी ४१ कोटी एकर जमीन शेतीयोग्य आहे.
या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव उपस्थित होते.
महिलांना विधिमंडळात ३५% आरक्षण
भाजप आणि काँग्रेस एकच आहेत. ते फक्त शाब्दिक भांडणात गुंतले आहेत. ‘तोट्याचे समाजीकरण आणि नफ्याचे खासगीकरण’ असा भाजप सरकारचा फॉर्म्युला आहे. देशात दलित गरीब आहेत. सत्तेत आल्यास देशातील २५ लाख कुटुंबांना दरवर्षी दलित बंधूंचा लाभ दिला जाईल. महिलांना विधिमंडळात ३५ टक्के आरक्षण देण्याचा आमचा प्रस्ताव आहे. -के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगणा
एनडीए सरकार पाडण्याची लोकांना संधी
देशातील जनतेला २०२४ च्या निवडणुकीत केंद्रातील एनडीए सरकार पाडण्याची संधी मिळेल. निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना त्रास देणारे काही राज्यांचे राज्यपाल हे पंतप्रधान मोदी यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. मोदींना जनतेच्या प्रश्नांची चिंता नसून, कोणता आमदार विकत घ्यायचा आणि कोणते सरकार पाडायचे, याचाच ते विचार करत आहेत. -अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली
भाजप सरकारचे ४०० दिवस उरले
भाजप सरकारने आपले दिवस मोजण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीसाठी केवळ ४०० दिवस उरले आहेत. त्यानंतर एक दिवसही हे सरकार टिकणार नाही. सर्व पुरोगामी नेत्यांनी एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी काम करण्याची वेळ आली आहे. -अखिलेश यादव, सपाचे प्रमुख
संविधानासाठी एकत्र यावे
भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार देशाच्या लोकशाहीचा पाया उद्ध्वस्त करत आहे. धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र यावे. -पिनाराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ
अग्निपथ योजना रद्द करणार
बीआरएस सत्तेत आल्यास अग्निपथ योजना रद्द केली जाईल. तेलंगणातील रयथू बंधू (शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी)सारख्या योजना देशभरात लागू केल्या जातील.