भारताचा आणखी एक शेजारी देश म्यानमार अस्थिरतेच्या फेऱ्यातून जात आहे. गृहयुद्धामुळे तेथील परिस्थित चिघळली आहे. काही महिन्यांपूर्वी म्यानमारच्या सीमेलगतच्या हजारो नागरिकांनी भारतात येत शरण घेतली होती. आता सैन्यही पळून येऊ लागले आहे. म्यानमारचे जवळपास १५१ सैनिक भारतात पळून आले आहेत.
आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. एका सशस्त्र जातीय गटाने सैन्याच्या तळांवर हल्ले केले आहेत. हे सैन्य तळ या गटाने ताब्यात घेतले आहेत. यामुळे तेथील जवळपास १५१ सैनिक पळून मिझोरमच्या लॉन्गतलाई जिल्ह्यात आले आहेत. तातमादाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या म्यानमारच्या सैनिकांनी भारतात शरण घेतली आहे. शस्त्रास्त्रे घेऊन ते भारतात दाखल झाले.
आराकान आर्मीच्या सशस्त्र गटाने त्यांच्या तळावर ताबा मिळविला आहे. गेल्या काही दिवसांपासून म्यानमार आर्मी आणि अरकान आर्मीच्या सैन्यामध्ये जोरदार गोळीबार होत आहे. शुक्रवारी मिझोराममध्ये घुसलेले म्यानमार आर्मीचे काही सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. आसाम रायफल्सने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आहेत.
हे सर्व म्यानमार लष्कराचे सैनिक आता म्यानमार सीमेजवळील लोंगतलाई जिल्ह्यातील पर्व येथे आसाम रायफल्सच्या सुरक्षित ठिकाणी आहेत. या सैनिकांना पुन्हा म्यानमारला पाठविण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि म्यानमारच्या लष्करामध्ये याबाबत चर्चा सुरु आहे, असे आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये देखील म्यानमार-भारत सीमेवरील लष्करी छावण्या लोकशाही समर्थक मिलिशिया - पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) ने ताब्यात घेतल्यावर एकूण 104 म्यानमार सैनिक मिझोरामला पळून आले होते.