श्रीनगर - जम्मू आमि काश्मीरमध्ये तिन्ही पक्षांच्या माजी मुख्यमंत्र्यांनी एकत्र येत कलम 370 हटविल्याचा विरोध केला आहे. तसेच, यासंदर्भात एकत्र येऊन मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही या काश्मिरी नेत्यांकडून देण्यात आलाय. माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांची घरी एक बैठक घेण्यात आली. काश्मीरसाठी या बैठकीला अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. या बैठकीत पीडीपी, पिपुल्स कॉन्फ्रेन्स आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता.
फारुक अब्दुल्लांनी बैठकीनंतर बोलताना म्हटले की, 5 ऑगस्ट 2019 पूर्वीचे सर्व अधिकार आम्हाला परत मिळावे. तसेच, मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षासोबत आघाडी केल्याची घोषणाही अब्दुल्ला यांनी केली. या आघाडीला पिपुल्स अलायंस फॉर गुपकार डिक्लेरेश हे नाव देण्यात आले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखला ते सर्व अधिकार देण्यात यावेत, जे त्यांच्यापासून काढून घेण्यात आले आहेत. 5 ऑगस्ट 2019 पूर्वीचे सर्व अधिकार भारत सरकारने राज्यांना परत करावेत, अशी मागणीही अब्दुल्ला यांनी केली.