नवी दिल्ली - अमेरिकेचे नागरिक असलेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ प्रा. अभिजित विनायक बॅनर्जी, त्यांच्या फ्रेंच पत्नी एश्थर ड्युफ्लो आणि अमेरिकेचे प्रा. मायकेल क्रेमर या तिघांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला. अर्थशास्त्रातील सैद्धांतिक संशोधनाबद्दल हा सर्वोच्च बहुमान मिळविणारे प्रा. बॅनर्जी हे डॉ. अमर्त्य सेन यांच्यानंतरचे भारतीय वंशाचे दुसरे अर्थतज्ज्ञ आहेत. बॅनर्जी यांचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. मात्र या टीकेनंतर नेटिझन्सनी हेगडे यांना ट्रोल केले आहे.
अनंतकुमार हेगडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केलं आहे. 'ज्या व्यक्तीने पप्पूच्या माध्यमातून महागाई आणि करप्रणाली वाढवण्याची शिफारस केली होती त्या व्यक्तीला 2019 चा नोबेल पुरस्कार मिळाला. न्याय योजनेचा पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तीला नोबेल मिळाल्याबाबत 'पप्पू' ला आनंद झाला असेल' असं ट्विट केलं आहे. नोबेल विजेते अभिजित बॅनर्जींवर टीका करणे अनंतकुमार हेगडेंना भारी पडले आहे. नेटिझन्सनी हेगडेंना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
नेटिझन्सनी अनंतकुमार हेगडे यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या दोलायमान स्थितीत आहे व नजीकच्या भविष्यात ती सावरण्याची चिन्हे दिसत नाहीत, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांनी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केले आहे.
अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला नोबेल मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना प्रा. बॅनर्जी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान आहे. विकासदराची ताजी आकडेवारी पाहता, नजीकच्या भविष्यात अर्थव्यवस्था सावरेल, याची खात्री देता येत नाही. गेली पाच-सहा वर्षे निदान काही विकास होताना तरी दिसत होता, पण ती आशाही आता मावळली आहे. पुरस्काराविषयी ते म्हणाले की, ज्यासाठी पुरस्कार दिला, त्या विषयावर मी गेली 20 वर्षे संशोधन करत आलो आहे. त्यातून आम्ही दारिद्र्य निर्मूलनाच्या समस्येवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला, पण करिअरमध्ये एवढ्या लवकर हा पुरस्कार मिळेल, असे वाटले नव्हते.