ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - गेल्या काही दिवसांत वादग्रस्त ट्विट करणारे गायक अभिजित भट्टाचार्य यांना अखेर ट्विटरनेच दणका दिला. ट्विटर अकाउंट बंद करत त्यांची बोलतीच बंद केली आहे.
अभिजित भट्टाचार्य गेल्या काही दिवसांपासून कोणत्या-ना-कोणत्या विषयावर वादग्रस्त ट्विट करुन चर्चेत येत होते. यावर ट्विटरच्या काही युजर्सनी सतत त्यांच्या आयडीला रिपोर्ट केले. त्यानंतर ट्विटरने याची दखल घेत अभिजित भट्टाचार्य यांचं ट्विटर अकाउंटच बंद करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, काल बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी ज्या लष्करी अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला. त्या अधिका-याने युवकाऐवजी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवे होते असे टि्वट केले होते. त्यांच्या या ट्विटचे नेहमी वादात राहणारा गायक अभिजित भट्टाचार्य यांनी समर्थन केलं होतं. केवळ समर्थन नाही तर, परेश रावल यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत त्याने अरुंधती रॉय यांना जीपला बांधून गोळ्या घालायला हव्यात, असं ट्विट केलं होतं. याचबरोबर, याआधीही त्यांनी महिलांविरोधात आक्षेपार्ह ट्विट केलं होतं.