अभिजित कोळपे बातमी : संस्कार शिबिरात विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सन्मान
By admin | Published: May 08, 2015 10:46 PM
गोटेमाळ शाळा : विद्यार्थी, पालकांनी व्यक्त केली कृतज्ञता
गोटेमाळ शाळा : विद्यार्थी, पालकांनी व्यक्त केली कृतज्ञताजेजुरी : गोटेमाळ (खळद) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवारी संस्कार शिबिराचा समारोप होता. या दिवशी विद्यार्थी व पालकांनी अचानकपणे तयारी करून फुलांची सजावट, रांगोळी, पोशाख व दोघांना घड्याळ अशा अनेक वस्तू भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. गोटेमाळ येथे चौथीपर्यंत शाळा आहे. मुख्याध्यापक दिलीप कांबळे व त्यांच्या पत्नी उज्ज्वला कांबळे हे दोघे येथे अध्यापनाचे काम करतात. शाळेत अनेक उपक्रम ते राबवित असतात. शाळेचा निकाल लागल्यानंतर ७ तारखेला शेवटचा दिवस असल्याने संस्कार शिबिराचे आयोजन शाळेत केले होते. मुलांनी पालकांनी अगोदर तयारी करून ठेवली होती. एका वर्गात फुगे, रांगोळी, फुलांचे तोरण, मेणबत्या लावून तयारी करून ठेवली होती. शिक्षक येताच त्यांचे फुलांनी स्वागत करण्यात आले. दोघांना पोशाख करण्यात आला. मनगटी घड्याळ व अनेक उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. ग्रामस्थांनी यानिमित्त भोजनाच्या कार्यक्रमाचेही नियोजन केले होते. पालकांच्या व मुलांच्या स्वागताने शिक्षकही भारावून गेले.शिक्षकांच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने पालकांनी व विद्यार्थ्यांनी दोन्ही शिक्षकांचा यथोचित सन्मान केला. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर कामथे, कैलास कामथे, तानाजी कामथे, ताम्हाणे आबा, ज्योती अवसरमोल, सुमन बंकट, पूजा कामथे, राणी कामथे, मयूरी कामथे आदींनी सन्मान घडवून आणला.