नवी दिल्ली- भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी सीमेपलीकडेही अतुलनीय शौर्याचं अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. पाकिस्तानी विमानांनी केलेली घुसखोरी हाणून पाडण्यासाठी त्यांचा माग काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान बुधवारी (ता. 27) कोसळले. त्याच दरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पॅराशूटच्या साहाय्याने बाहेर पडण्यात यशस्वी झाले.विशेष म्हणजे पाकिस्तानी सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलं असतानाही त्यांनी पाकिस्तानला भारतासंदर्भातील संवेदनशील माहिती देण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, विंग कमांडर जेव्हा पाकव्याप्त भागातील जमिनीवर कोसळले, त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना घेरलं. तेव्हा त्यांनी त्या लोकांना विचारलं की, मी भारतात आहे काय ?, स्थानिक नागरिकांनी तुम्ही भारतात असल्याचं सांगत त्यांना गावात घेऊन गेले. तिकडे गेल्यानंतर अभिनंदन यांना लागलीच समजलं की ते भारतात नव्हे, पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. त्यांनी हवेत गोळीबार केला आणि नियंत्रण रेषेच्या दिशेनं ते धावत सुटले. त्यांना पकडण्यासाठी गावातील लोकही त्यांच्या मागे धावू लागली. अभिनंदन यांना कल्पना आली की आता आपण नियंत्रण रेषा ओलांडून भारतात जाऊ शकत नाही. त्याच वेळी त्यांनी धावता धावता जवळच्याच एका तलावात उडी मारली. पाण्यात उडी घेतल्यानं त्यांच्याजवळ असलेली महत्त्वाची कागदपत्रं पाण्यात भिजली. त्यामुळे भिजलेली ती कागदपत्रे नष्ट करण्यास अभिनंदन यांना यश आलं. त्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याचे जवान पोहोचले आणि त्यांनी अभिनंदन यांना भीमबर आर्मीच्या एका कॅम्पमध्ये नेले. अभिनंदन यांना ताब्यात घेताच पाकिस्ताननं त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्याकडून भारताच्या पुढील योजना, रणनीती याबद्दलची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मारहाण होऊनही अभिनंदन यांनी कोणतीही गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली नाही. 'माझं नाव विंग कमांडर अभिनंदन आहे. माझा सर्व्हिस नंबर 27981 आहे. मी फ्लाइंग पायलट असून हिंदू आहे,' इतकीच जुजबी माहिती त्यांनी दिली होती. या व्हिडीओत अभिनंदन यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसत होती. अभिनंदन यांच्या मारहाणीचा व्हिडीओ समोर येताच भारतानं पाकिस्तानला संपर्क केला आणि त्यांच्या सुखरुप सुटकेची मागणी केली. युद्धकैदीला मारहाण करून पाकिस्तान जिनिव्हा कराराचा भंग करत असल्याचा आरोप भारतानं केला होता. यानंतर पाकिस्ताननं अभिनंदन यांचा नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला. यामध्ये अभिनंदन चहा पित असताना दिसत होते.
पाकच्या भूमीत असल्याचं कळताच अभिनंदन यांनी जे केलं, ते वाचून कराल सलाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 4:03 PM