नवी दिल्ली - मिग-21 विमानातून एफ-16 सारखं अत्याधुनिक विमान जमीनदोस्त करणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान केला जाणार आहे. अभिनंदन यांच्या स्क्वाड्रन 51चा वायुदलाकडून विशेष सन्मान होणार आहे. पाकिस्तानचा हवाई घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याच्या कामगिरीबद्दल हा सन्मान केला जाणार आहे. एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरीया हे अभिनंदन यांच्या स्क्वार्डनचा सन्मान करणार आहेत.
भारतातील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. याचदरम्यान पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली होती आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले होते. पाकिस्तानने लगेच त्यांना कैदेत घेतले होते. कैदेत असताना त्यांच्याकडून भारतीय लष्कराची महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला होता.
विंग कमांडर अभिनंदन यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे. कंट्रोल रूममधली परिस्थिती भारतीय हवाई दलाच्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांनाही वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे. त्यानंतर आता अभिनंदन यांच्या स्क्वाड्रन 51चा वायुदलाकडून सन्मान विशेष सन्मान होणार आहे. आमची हवाई दलाची टीम 26 जुलैला बालाकोटवर हवाई हल्ला करून यशस्वीरित्या माघारी परतली होती. आमच्याकडे हवाई सीमेचे रक्षण करण्यासाठी कमी विमाने होती. ते (पाकिस्तानी) भारतात विध्वंस करण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने घुसले होते. मात्र, आमच्या पायलटनी धाडस दाखविल्याने त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त झाले, असं अग्रवाल यांनी म्हटलं होतं.
अटीतटीच्या क्षणांवेळी अभिनंदन यांनी अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले एफ-16 पाडले. तेव्हाची परिस्थिती युद्धाची होती. त्यांची विमाने मोठ्या संख्येने होती आणि आमच्या लढाऊ विमानांनी त्यांना कडवी झुंज दिली. 26 आणि 27 तारखेच्या लढाईमध्ये मी देखील सहभागी होते. अभिनंदन यांच्यासोबत दोन्ही बाजुने संभाषण करत होते. जेव्हा त्यांचे विमान हवेत होते, तेव्हा त्यांना दुष्मनाच्या विमानांचा अचूक ठावठिकाणा कळवत होते. अभिनंदन यांना आसपासच्या परिस्थितीचे माझ्याकडून योग्य मार्गदर्शन झाल्याने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडता आल्याची माहिती मिंटी अग्रवाल यांनी दिली होती.