कोईमतूर: जवळपास 60 तास पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशी परतलेले हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी काल पुन्हा एकदा उड्डाण करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर आज हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या प्रश्नाचं उत्तर अभिनंदन यांच्या वैद्यकीय तंदुरुस्तीवर अवलंबून असल्याचं धनोआ म्हणाले. हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी पत्रकार परिषद घेऊन एअर स्ट्राइकवर सविस्तर भाष्य केलं. यावेळी त्यांना अभिनंदन पुन्हा विमान उड्डाण कधी करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. 'ते (विंग कमांडर अभिनंदन) पुन्हा विमान उड्डाण करू शकतात की नाही, हे त्यांच्या वैद्यकीय तंदुरुस्तीवरून ठरेल. अभिनंदन यांनी त्यांच्या विमानातून उडी घेतली. यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जात आहेत. ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त झाल्यावर कॉकपिटमध्ये परततील,' असं धनोआ यांनी सांगितलं. मिग-21 विमानातून एफ-16 सारखं अत्याधुनिक विमान जमीनदोस्त करणाऱ्या अभिनंदन यांचं सध्या सर्वत्र कौतुक सुरू आहे. जवळपास 60 तास पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशात परतलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांची आकाशाची ओढ कायम आहे. पाकिस्तानी सैन्याला कोणतीही गोपनीय माहिती न देणाऱ्या अभिनंदन यांनी पुन्हा एकदा कॉकपिटमध्ये परतण्याची इच्छा कालच व्यक्त केली. मला लवकरच विमान उडवायचं आहे, अशी भावना अभिनंदन यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे बोलून दाखवली. नवी दिल्लीतल्या सैन्याच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात अभिनंदन यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि वरिष्ठ कमांडोंनी अभिनंदन यांची भेट घेतली. यानंतर वरिष्ठ कमांडो आणि डॉक्टरांकडे अभिनंदन यांनी लवकरात लवकर विमान उड्डाण करण्याची इच्छा व्यक्त केली. भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले चढवले. यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पाकिस्तानच्या हवाई दलाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची मिग-21 विमानं हवेत झेपावली. यावेळी दोन्ही हवाई दलांमध्ये संघर्ष सुरू असताना अभिनंदन यांनी पाकिस्तानचं एफ-16 हे अत्याधुनिक विमान जमीनदोस्त केलं. अभिनंदन हे एफ-16 विमान पाडणारे भारतीय हवाई दलाचे पहिले वैमानिक आहेत.