नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) ५ जानेवारी रोजी अभाविपने डाव्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर सशस्त्र हल्ला केला, असा दावा एका नियतकालिकाने स्टिंग आॅपरेशनद्वारे केला आहे. विद्यापीठातील सर्व्हर डाव्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडल्याचेही या नियतकालिकाने म्हटले आहे. मात्र, अक्षत अवस्थी आपला कार्यकर्ता असल्याचा दावा अभाविपने फेटाळला आहे.
डाव्या विद्यार्थी संघटनांनीच अभाविपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला होता. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांच्या दाव्याच्या दुसऱ्याच दिवशी एका नियतकालिकाने जेएनयूत केलेल्या आपल्या स्टिंग आॅपरेशनचा वृत्तांत झळकविला. जेएनयूमध्ये फ्रेंच भाषेचा पदवी अभ्यासक्रम शिकत असलेल्या अक्षत अवस्थी याचे स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. त्यात अभाविपचा कार्यकर्ता असल्याचे त्याने मान्य केले आहे. जेएनयूच्या हाणामारीतील एका व्हिडिओत हेल्मेट घातलेला व हातात काठी घेतलेला युवक म्हणजे आपणच असल्याचेही अक्षत म्हणाला. त्याने सांगितले की, डाव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यासाठी अभाविपचे जेएनयू व बाहेरचे प्रत्येकी २० कार्यकर्ते आपणच बोलावले होते. अक्षतने एका झेंड्याची काठी काढून ती हातात घेतली. कोणीही ओळखू नये म्हणून रोहित शहा या मित्राचे हॅल्मेट घातले.गीताकुमारीने केले कृत्याचे समर्थन४ जानेवारी रोजी जेएनयूचे सर्व्हर बंद पाडण्यात आपण सहभागी होतो, अशी कबुली डाव्या विचारसरणीची विद्यार्थिनी गीताकुमारी हिने स्टिंग ऑपरेशनमध्ये दिली आहे. जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीशकुमार विद्यार्थ्यांना भेटत नाही.आमची एकही मागणी मान्य होत नाही. त्यामुळे आम्ही सर्व्हर बंद पाडण्याचे ठरविले. त्यामुळे प्रवेशप्रक्रियाही थांबणार होती. म्हणून आम्ही हे कृत्य केल्याचे गीताकुमारीने सांगितले.या नियतकालिकाने स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ झळकविल्यानंतरही गीताकुमारीने आपल्या कृत्यांचे समर्थनच केले आहे.