विशाखापट्टणम - तरुणीवर तिच्याच मित्राने हल्ला करत मित्रांच्या मदतीने बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आरोपीने तरुणीची छेड काढत बलात्काराचा प्रयत्न करत असल्याचं कृत्य मित्रांच्या मदतीने मोबाइलमध्ये कैद केलं. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
आरोपींनी व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तरुणीवर अमानुषपणे अत्याचार करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. तरुणी वारंवार दयेची भीक मागत पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र आरोपी तरुण वारंवार तिला खेचत तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पीडित तरुणीवर बलात्काराची प्रयत्न होताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत असणारी दुसरी तरुणी मध्यस्थी करत सुटका करण्याचा प्रयत्न करते. मात्र आरोपी तिलाही हटकून देत आपलं पाशवी कृत्य सुरु ठेवतो.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलं आहे की, पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण आरोपी बी साई याला भेटण्यासाठी मंदिरात आल्या होत्या. पीडित तरुणी आरोपीला गेल्या एक वर्षापासून ओळखत होती. घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने कुठेही घटनेची वाच्यता केली नाही. मात्र व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाला असून तो व्हायरल होत असल्याचं कळल्यानंतर तिने कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. यानंतर पीडित तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. आरोपी तरुणांमध्ये कार्तिक नावाचा एक तरुणदेखील आहे. पीडित तरुणीची त्याच्याशीही मैत्री होती.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, पीडित तरुणीची दुस-या तरुणासोबत झालेली मैत्री कार्तिकला खटकत होती. संतापलेल्या कार्तिकनेच आपला मित्र बी साईला पीडित तरुणीसोबत हे कृत्य करण्यासाठी उसकावलं होतं. आरोपींमधील एक तरुण कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दुसरा तरुण ग्रॅज्यूएट आहे.
अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र त्यासाठी जागरुकता असणंही तितकंच गरजेचं आहे. अशा घटनांची माहिती मिळताच पोलिसांना कळवलं, तर व्हिडीओ व्हायरल होण्यापासून थांबवता येऊ शकतो असं पोलिसांनी सांगितलं आहे.