तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर मौन सोडलं आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी बलात्काराच्या प्रकरणांबाबत कठोर कायदा आणण्याची मागणी केली. तसेच बलात्कारी आणि नराधमांवर त्वरीत खटला चालवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये अभिषेक बॅनर्जी यांनी देशाच्या विविध भागांमध्ये घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांचा उल्लेख केला आणि सांगितलं की, दररोज ९० बलात्काराच्या बातम्या समोर येतात. ते म्हणाले की, निर्णायक पावलं उचलण्याची नितांत गरज आहे आणि त्यासाठी मजबूत कायदे आवश्यक आहेत.
अभिषेक बॅनर्जी यांनी लिहिलं की, "गेल्या १० दिवसांपासून जेव्हा संपूर्ण देश #RGKarMedicalcollege घटनेचा निषेध करत आहे आणि न्यायाची मागणी करत आहे, लोक रस्त्यावर उतरून या भयंकर गुन्ह्याविरोधात आंदोलन करत होते, नेमकं तेव्हाच भारताच्या विविध भागात बलात्काराच्या ९०० घटना घडल्या आहेत. दुर्दैवाने, कायमस्वरूपी उपायांवर अजूनही फारशी चर्चा झालेली नाही."
आकडेवारीचा हवाला देत अभिषेक बॅनर्जी यांनी पुढे म्हटलं की, "दररोज ९० बलात्काराच्या घटना, दर तासाला ४ घटना आणि दर १५ मिनिटाला एक बलात्काराची घटना नोंदवली जात आहे. तातडीने निर्णायक पावलं उचलण्याची गरज आहे. आम्हाला असे मजबूत कायदे हवे आहेत ज्यात ५० दिवसांच्या आत खटला आणि दोषींना दोषी ठरवलं जावं आणि नंतर कठोर शिक्षा द्यावी. पोकळ आश्वासनं देऊन काहीही साध्य होणार नाही."
"राज्य सरकारांनी कारवाई करावी आणि बलात्कारविरोधी कठोर कायदा करण्यासाठी केंद्रावर तातडीने दबाव आणावा. जलद आणि कठोर न्याय सुनिश्चित करणारा कायदा बनवला गेला पाहिजे. वेक अप इंडिया!" असं अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.