कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना सोमवारी कोलकाता विमानतळावरील इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परदेशात जाण्यापासून रोखले. मिळालेल्या माहितीनुसार, रुजिरा बॅनर्जी आपल्या दोन मुलांसह सकाळी सात वाजता विमानतळावर पोहोचल्या होत्या. त्यांची दुबईला जाण्यासाठी फ्लाइट होती.
इमिग्रेशन विभागाच्या अधिकार्यांनी रुजिरा बॅनर्जी यांना परदेशात जाण्यास मनाई केली. दरम्यान, ईडीने एका प्रकरणात लुकआउट नोटीस जारी केली होती. त्याचा हवाला देत रुजिरा बॅनर्जी यांना परदेशात जाण्यापासून रोखले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी रोखल्यानंतर रुजिरा बॅनर्जी सकाळी 11 च्या सुमारास विमानतळावरून घरी परतल्या. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने अभिषेक आणि त्यांच्या पत्नीला परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे, असे अभिषेक बॅनर्जी यांच्या जवळच्या सहकाऱ्याने सांगितले. तर सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाचा हवाला देत अभिषेक आणि रुजिरा बॅनर्जी या प्रकरणी कायदेशीर पावले उचलू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कोळसा तस्करी प्रकरणी ईडीने अभिषेक आणि रुजिरा बॅनर्जी यांची अनेकदा चौकशी केली आहे. या संदर्भात अभिषेक यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे.