नवी दिल्ली-
अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग यांनी भारत दौऱ्यात चीनप्रश्नी रशिया तुमच्या मदतीला धावून येईल अशी अपेक्षाच ठेवू नका, असं विधान केलं होतं. त्यावर आता काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिका तरी कधी चीनप्रश्नी आमच्या मदतीला धावून आली?, असा प्रतिसवाल सिंघवी यांनी केला आहे.
युक्रेन-रशियातीलयुद्धाच्या मुद्द्यावर रशियाविरोधात कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भारताशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. "रशियाकडून भारतानं आयातीत वाढ केल्याची माहिती जाणून घेण्यात अमेरिका अजिबात इच्छुक नाही. तसंच युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियावर जगभरात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचं उल्लंघन कोणत्याही देशानं करु नये", असा स्पष्ट संदेश दलीप सिंग यांनी दिला होता. तसेच "चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या नियमांचं उल्लंघन केल्यास रशिया तुमच्या मदतीला धावून येईल अशी अजिबात अपेक्षा ठेवू नका, कारण चीन आणि रशिया यांची घनिष्ट मैत्री आहे", असंही दलीप सिंग म्हणाले होते.
दलील सिंग यांच्या याच विधानाचा दाखला देत अभिषेक मनू सिंघवी यांनी एक ट्विट केलं आहे. "चीननं जर सीमा नियमांचं उल्लंघन केलं तर रशिया तुमच्या मदतीला धावून येणार नाही असं विधान दलीप सिंग यांनी केलं ते ठीक आहे. पण चीननं गेल्या काही वर्षात बऱ्याचदा सीमा नियमांचं उल्लंघन केलं तेव्हा अमेरिका तरी कुठं भारतासाठी धावून आली?", असं रोखठोक ट्विट सिंघवी यांनी केलं आहे.
"भारतानं रशियाकडून आयात वाढवलेली आम्हाला आवडणार नाही. विशेषत: ऊर्जा क्षेत्रात असं केलं जाऊ नये. कारण जागतिक निर्बंधांच्या दृष्टीनं उल्लंघन केल्याचं ठरू शकतं", असं दलीप सिंग म्हणाले होते. ते रशियाकडून स्वस्तात कच्च्या तेलाची आयात करण्याबाबत भारताला ऑफर आल्याच्या प्रश्नवरील उत्तरात बोलत होते. यूएस आर्थिक निर्बंधांमुळे ऊर्जा देयकांना सूट मिळते आणि रशियाकडून ऊर्जा आयातीवर सध्या कोणतीही बंदी नाही हे लक्षात घेता सिंग म्हणाले की, रशियासारख्या “अविश्वसनीय ऊर्जा पुरवठादार” देशावरील त्यांचं अवलंबन कमी करण्यातच अमेरिका आणि त्याच्या युरोपियन मित्र राष्ट्रांचं सामायिक हित असल्याचंही विधान त्यांनी केलं होतं.