नवी दिल्ली - भारतीय हवाई दल चीनचा मुकाबला करण्यासाठी सक्षम असून, एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाडयांवरील लढाईसाठी पूर्णपणे सज्ज आहे असे हवाई दल प्रमुख बी.एस.धानोआ गुरुवारी सांगितले.
एअर फोर्स डे च्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. एअर फोर्स कुठल्याही मोहिमेसाठी तयार आहे पण सर्जिकल स्ट्राईकसारख्या ऑपरेशनमध्ये हवाई दलाला सहभागी करुन घ्यायचे कि, नाही तो निर्णय सर्वस्वी सरकारचा आहे असे धानोआ यांनी सांगितले.
पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भारतीय हवाई दल एकाचवेळी दोन लढाया लढण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. डोकलाम संघर्ष संपल्यानंतर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी देशाने एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाडयांवर युद्धासाठी सज्ज असले पाहिजे असे वक्तव्य केले होते. त्यावरुन चीनने त्यांच्यावर आगपाखड केली होती. भारताला जे धोके आहेत ते लक्षात घेता 42 स्कवाड्रनची आवश्यकता आहे. 2032 पर्यंत भारतीय हवाई दलाकडे इतकी स्कवाड्रन्स असतील असे त्यांनी सांगितले.