गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Coronavirus Patient) मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तर दुसरीकडे कमी होणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आता कोविडचे सर्व निर्बंधही हटवले आहेत. असं असलं तरी आता सर्वसामान्यांसाठी आणखी एक गुड न्यूज आहे. १८ वर्षांवरील सर्वांना आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. १० एप्रिल पासून सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर (प्रिकॉर्शनरी) डोस देण्यात येईल.
१८ वर्षांवरील ज्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि ज्यांना लसीचा दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण झाले आहेत, त्यांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. परंतु हा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस खासगी लसीकरण केंद्रांमध्ये घेता येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. याशिवाय कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या, तसंच आरोग्य सेवा कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत सुरूच राहिल आणि त्याला गती दिली जाईल असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.