ऑनलाइन लोकमत
बन्नू, दि. 10- एखाद्या व्यक्तिला साधारण किती मुलं असू शकतात ? खरंतर याचा अंदाज आपण कदाचित पटकन लावू नाही शकत. पण पाकिस्तानमधील एक गोष्ट ऐकुन तुम्हाला धक्का बसेल. पाकिस्तानमध्ये एका व्यक्तिला तब्बल ३८ मुलं आहेत. तर आणखी दोन जणांना प्रत्येकी ३६ मुलं असल्याचं पाकिस्तानच्या जनगणनेतून समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे ही मुलं अल्लाची देण आहे, असं तो व्यक्ती अभिमानाने सांगतो आहे.
बलूचिस्तानच्या क्वेटामध्ये राहणाऱे जान मोहम्मद यांना ३८ मुले आहेत. २०१६ मध्ये त्यांनी चौथं लग्न करण्याविषयी सांगितलं होतं. कारण त्यांना १०० मुलांना जन्म द्यायचा होता. पण कोणतीच महिला त्यांच्याशी लग्न करायला तयार नाही. पण तरीही ते चौथ्या लग्नासाठी तयार झाले. मुस्लिमांची जेवढी जास्त लोकसंख्या असेल तेवढं चांगलं. त्यामुळे पाकिस्तानला शत्रू घाबरतील. आम्ही जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे, असं जान मोहम्मद यांचं मत आहे.
पाकिस्तानात तब्बल १९ वर्षानंतर जनगणना करण्यात आली आहे. जुलैमध्ये त्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे. पण या जनगणनेतून अनेक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. १९९८ मध्ये पाकिस्तानची लोकसंख्या १३.५ कोटी होती. आता ही लोकसंख्या २० कोटी झाली आहे. जागतिक बँक आणि सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तान दक्षिण आशियातील सर्वाधिक जन्मदर असणारा देश आहे. पाकिस्तानात सरासरीनुसार प्रत्येक महिलेला तीन मुलं आहेत.
गुलजार खान या व्यक्तीला ३६ मुलं आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अल्लाहने संपूर्ण जगात मानवाची निर्मिती केली आहे. त्यामुळे मुलं जन्माला घालणारी नैसर्गिक प्रक्रिया का थांबवावी ? असं मत ते व्यक्त करतात. कबाली परिसरातील बन्नू येथे राहणारे गुलजार यांची तिसरी बायको गर्भवती आहे. आम्हाला सक्षम व्हायचं आहे. क्रिकेट खेळताना माझ्या मुलांना आता मित्रांची गरज नाही, असं गुलजार यांनी सांगितलं. इतकंच नाही, तर गुलजारचा भाऊ मस्तान खान वजीर यांनाही तीन पत्नी आहेत. वजीर यांना २२ मुले आहेत. त्यांच्या नातवंडांची संख्या एवढी आहे की त्यांना मोजताही येत नाही, असं मस्तान खान यांचं म्हणणं आहे. अन्न आणि वस्त्र देण्याचं अल्लाने वचन दिलं आहे. पण लोकांचा त्यांच्यावर विश्वास कमी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
एखाद्या व्यक्तीला इतकी मुलं असणं हे सोई-सुविधा पुरविण्याच्या तसंच आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. याचा विकासावर वाईट परिणाम होइल, असं संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या परिषदेच्या कंट्री निर्देशक जेबा ए. साथर यांनी सांगितलं आहे.