ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 11 - गुजरातमधील सोमनाथ मंदिराला तब्ब्ल 12 कोटी रुपये किंमतीचं 40 किलो सोनं दान करण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईतील हिरे व्यापारी दिलीप लाखी यांनी हे अचाट दान केलं आहे. मात्र सोमनाथ मंदिरात दान करण्याची दिलीप लाखी यांची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेक वेळा लाखी यांनी अशाप्रकारे दान केलं आहे. मागच्या तीनवर्षात लाखी कुटुंबाने सोमनाथ मंदिराला 109 किलो सोनं दान केलं आहे.
या सोन्याचा वापर मंदिराची सजावट आणि अन्य कामांसाठी करण्यात येतो अशी माहिती सोमनाथ मंदिर ट्रस्टचे सचिव प्रविणभाई लहेरी यांनी दिली आहे. दिलीप लाखी यांनी आतापर्यंत सोमनाथ मंदिराला दान केलेल्या सोन्याची किंमत ३० कोटी रुपयाच्या घरात आहे. २०१२ मध्ये दिलीप लाखी यांनी ३० किलो वजनाची सोन्याची थाळी सोमनाथ मंदिराला दिली होती.
दिलीप लाखी प्रसिद्ध उद्योजक आहेत. 2013मध्ये ब्रीच कॅण्डी रुग्णालयाच्या शेजारी 350 कोटींचं कॅडबरी हाऊस खरेदी केल्यानंतर दिलीप लाखी प्रसिद्धीझोतात आले होते. 'माझ्या कामासाठी दान हा शब्द कृपया वापरु नका. आपलं काहीच नसतं मग या संपत्तीबद्दल काय बोलायचं ? देवाकडून मिळालेल्या या संपत्तीची मी फक्त सुरक्षा करत आहे, जे त्याचं आहे ते त्याला परत करत आहे', अशी भावना दिलीप लाखी यांनी व्यक्त केली आहे.
दिलीप लाखी सर्व दान चेकने करतात, एक पैसाही रोख देत नाहीत. तसंच आपण दिलेल्या पैशांचा कसा वापर केला जातो ? याची पाहणीदेखील करतात. 'मी लाखी ट्रस्ट चालवतो आणि माझ्या व्यवसायातून फंडसाठी पैसे बाजूला ठेवतो. दहा वर्षापुर्वी मी बद्रिनाथ मंदिराला 54 किलो सोनं दान केलं होतं. त्यानंतर वेळोवळी सोमनाथ मंदिराची मी सेवा करत आहे', असं दिलीप लाखी बोलले आहेत.