ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 1 - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी जेव्हा व्यवसायिक कर उपायुक्तांच्या कर्नाटकमधील निवासस्थानी छापेमारी केली तेव्हा त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. छापेमारीदरम्यान कपाट खोललं तेव्हा त्यात साड्यांचा ढीग लागला होता. इतक्या साड्या होत्या की अधिका-यांना त्या मोजण्यासाठी सहा तास लागले. छापेमारीत सहभागी अधिका-यांनी सांगितलं की त्यांना वेगवेगळ्या डिजाईनच्या आणि कपड्यामधील एकूण 7000 साड्या मिळाल्या. या साड्यांची किंमत कोटींमध्ये आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक खोली पुर्णपणे साड्यांनी भरलेली होती. या साड्या व्यवसायिक कर उपायुक्त करियप्पा एन यांच्या पत्नीच्या आहेत. अधिका-यांनी जेव्हा करियप्पा यांच्या पत्नीकडे चौकशी केली तेव्हा आपल्या साड्यांचा व्यवसाय असल्याचा त्यांनी दावा केला. पण अधिका-यांनी सक्तीने चौकशी केल्यानंतर त्यांचा दावा खोटा असल्याचं समोर आलं.
घरात मिळालेल्या साड्या मोजण्यासाठी जवळजवळ सहा तास लागले. व्यवसायिक कर अधिका-याच्या पत्नीकडे इतक्या साड्या असणे यावर विश्वास बसणं थोडं कठीणच आहे. अधिक-याने साडीच्या दुकानावर छापा टाकून या साड्या घरी आणल्या असल्याची शक्यता आहे असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-याने सांगितलं आहे.
कोटींच्या किमतीत असलेल्या या साड्यांव्यतिरिक्त तपास अधिका-याने संपत्तीची कागदपत्रंही मिळाली आहेत. करियप्पा आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण तीन घरं, बंगळुरुत एक फ्लॅट, शेती आणि जमीन आहे. याशिवाय दागिने, महागडे बूट, घड्याळं आणि इतर महागडं सामान मिळालं आहे. करियप्पा यांची मुलं परदेशात शिक्षण घेत आहेत.