ऑनलाइन लोकमत
विल्लीपूरम (तामिळनाडू), दि. 29 - सैतानापासून वाचण्यासाठी लिंबू मिरचीच्या तोरणाचा वापर अनेक हिंदूंसाठी श्रद्धेचा विषय आहे. जेवणात चव आणण्यापलीकडे लिंबांचं स्थान हिंदूंच्या मनात असल्याचं वेगवेगळ्या प्रघातांवरून दिसतं. याचाच एक वेगळा अनुभव विल्लीपूरममधल्या एका मंदीरात नुकताच आला आहे. येथे झालेल्या पवित्र लिंबाच्या लिलावाला चक्क 39 हजार रुपयांची बोली लागली. नगुनी उथीराम या उत्सवामध्ये हा अघटित प्रकार घडला आहे.
तिरुवनैनतूरमधल्या मंदीरात सुरू असलेला मुरुगा या देवाचा 11 दिवस चालणारा उत्सव नुकताच समाप्त झाला. शेवटच्या दिवशी मंदीर प्रशासनाने पवित्र लिंबाचा लिलाव केला. ज्या कुणाच्या घरी सदर लिंबू जाते त्या कुटुंबाची भरभराट होते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या पवित्र लिंबासाठी चढाओढ लागते. अखेर, जयरामन व अमरावथी या दांपत्यानं 39 हजार रुपयांची बोली लावत पवित्र लिंबू मिळवले असून आता आपली भरभराट होईल याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्रही शंका नाही.