ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - रिलायन्स जिओच्या फ्री इंटरनेट आणि कॉलिंग सेवेवर ग्राहकांच्या अक्षरशः उड्या पडत आहेत. जिओनं आतापर्यंत 10 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. परंतु जिओचा डेटाबेस हॅक झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. एका वेबसाइटनं जिओचा डेटाबेस हॅक झाल्याचा दावा केला आहे. ग्राहकांचा डेटाबेस सुरक्षित असून, अशा बातम्या नेमक्या कशामुळे व्हायरल झाल्या आहेत, त्याचा कंपनी तपास करत आहे, अशी माहिती रिलायन्स कंपनीनं दिली आहे. रिलायन्सच्या जवळपास 1 कोटी 20 लाख ग्राहकांचा डेटा हॅक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. मात्र या वृत्ताला कंपनीकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. एवढ्या मोठ्या संख्येनं ग्राहकांचा डेटा हॅक झाल्यास भारतातील सर्वात मोठा डेटाबेस हॅक होण्याचा प्रकार ठरू शकते. रिलायन्स जिओचा डेटा हॅक झाल्याच्या मेसेजसोबत www.magicapk.com या वेबसाइटची लिंकही शेअर केली जात आहे. या वेबसाइटवर जिओचा नंबर टाकल्यास तुमच्या सिम कार्डची सर्व माहिती उघड होत आहे, असा दावा या मेसेजमधून करण्यात येत होता. सद्यस्थितीत या वेबसाइटची सेवा खंडित करण्यात आली आहे. या वेबसाइटवर जिओच्या सर्वच नंबरची माहिती उघड होत नव्हती. मात्र काही ठरावीक जिओ नंबर टाकल्यास माहिती उपलब्ध होत होती. वेबसाइटवर नंबर टाकल्यास ग्राहकांचा मोबाईल नंबर, सर्कल आणि सिम सुरू झाल्याची तारीख दिसत होती, असा दावा त्या मेसेजमधून करण्यात आला होता. आणखी वाचा(500 रूपयांचा जिओ 4G मोबाइल बाजारात येण्याची शक्यता)(सावधान! "जिओ"बाबतचं "ते" वृत्त म्हणजे निव्वळ अफवा)(जिओचा नवा धमाका, 1734 रुपयांत येणार जिओचा 4जी स्मार्टफोन)या सर्व प्रकाराची रिलायन्स जिओ कंपनीनं गंभीर दखल घेतली आहे. रिलायन्स कंपनीनं जिओचा डेटाबेस हॅक झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. आम्हाला समजलं आहे की, एका वेबसाइटनं निराधार आरोप करत आमचा डेटाबेस हॅक झाल्याचा खोडसाळपणा केला आहे. प्रथमदर्शनी ही माहिती अनौपचारिक असल्याचे दिसून येत आहे, असं स्पष्टीकरण जिओनं दिलं आहे. रिलायन्स जिओच्या ग्राहकांचा डेटा सुरक्षित आहे. ग्राहकांचा डेटा फक्त जिओ अधिका-यांच्या आवश्यकतेनुसार दिला जात आहे. आम्ही या सर्व प्रकाराची माहिती कायद्याची अंमलबजावणी करणा-या प्रशासनाला दिली आहे. तसेच त्या वेबसाइटवर लवकरात लवकर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.
Reliance Jio database breached: Company says data on site authentichttps://t.co/EW0lt8gKIi@IndianExpress— Vijay Chauthaiwale (@vijai63) July 9, 2017