ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 28 - मध्यप्रदेशमध्ये फक्त 1,200 रुपये कमावणारा सेल्समन करोडपती असल्याची माहिती समोर आली आहे. लोकायुक्तने केलेल्या कारवाईमध्ये ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. या कोट्यधीश सेल्समनचे नाव सुरेश प्रसाद पांडे असे आहे. मध्य प्रदेशमधल्या सिद्धी जिल्ह्यातील तो रहिवासी आहे.
लोकायुक्तने त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यामध्ये पांडेकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. यामध्ये सोन्याचे दागिने, चार वाहनांसह एक पिस्तुलाचाही समावेश आहे. तसंच पांडेची एकूण आठ बँकांमध्ये खाती आहेत. काही खाती त्याने बायको आणि मुलाच्या नावे केली आहेत.
लोकायुक्तचे अधिकारी सुरेंद्र सिंह आणि देवेश पाठक यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सेल्समन सुरेश पांडे कमवत असलेल्या रक्कमेपेक्षा 200 पट संपत्ती त्याच्याकडे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेहिशेबी मालमत्तेबाबत आलेल्या तक्रारींनुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती लोकायुक्त अधिका-यांनी दिली आहे. दरम्यान अजून ही कारवाई संपलेली नाही, अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.